वारकर्‍यांसाठी महाराष्‍ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !

मुंबई – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्‍या आषाढी वारीत सहभागी वारकर्‍यांसाठी ‘विठ्ठल-रुक्‍मिणी वारकरी विमा छत्र योजना’ चालू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. वारीच्‍या ३० दिवसांसाठी ही योजना लागू असेल. या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्‍यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्‍व आल्‍यास १ लाख आणि अंशत: अपंगत्‍व आल्‍यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्‍या कालावधीत आजारी पडल्‍यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल. वारीला असतांना अपघात किंवा दुर्घटना झाल्‍यास ‘मृत वा जखमी वारकर्‍यांच्‍या कुटुंबियांना आर्थिक साहाय्‍य मिळावे’, हा यामागचा उद्देश आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

या योजनेची कार्यवाही, संनियंत्रण आणि विमा हफ्‍ता भरण्‍याची कार्यवाही शासनाच्‍या मदत अन् पुनर्वसन विभागाकडून होईल. या विमा योजनेसंबंधीच्‍या अटी, शर्ती आणि अन्‍य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्‍यात आल्‍या आहेत. आवश्‍यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्‍यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्‍या शासन निर्णयात नमूद करण्‍यात आले आहे.