मांजरी (छत्रपती संभाजीनगर) येथील धार्मिक कार्यक्रमातील जेवणामधून विषबाधा !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी क्षेत्रातील कान्होबावाडी येथील एका कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात जेवण केल्यानंतर कुटुंब आणि नातेवाईक यांतील एकूण १६ जणांना विषबाधा झाल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. कान्होबावाडी येथे १९ जून या दिवशी तिखे कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये दुपारी अनेक जणांनी जेवण केले. रात्री हेच जेवण कुटुंब आणि नातेवाईक यांनी पुन्हा केल्यानंतर त्यातील १६ जणांना जुलाब आणि उलटी यांचा त्रास चालू झाला. या सर्वांवर उपचार करून सायंकाळी घरी सोडण्यात आले. या प्रसंगी आधुनिक वैद्यांनी कार्यक्रमातील एका अन्नपदार्थामुळे सर्वांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.