शहापूर तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाच्या धान्य खरेदीत १३७ कोटी रुपयांचा घोटाळा !
महामंडळाचे ४ अधिकारी निलंबित
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या धान्य खरेदीमध्ये १३७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवत प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे आणि अन्य ३ अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे ठाणे शहर येथील आमदार संजय केळकर यांनी वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई झाली. संबंधित अधिकार्यांची लाचलुचपत विरोधी विभागाच्या वतीने चौकशी करण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे.
महामंडळाच्या शहापूर कार्यालयाच्या वतीने वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत धान्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आदिवासी बांधव आणि शेतकरी यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या होत्या. यानंतर धान्यखरेदी योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार अधिकारी, व्यापारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीच्या संगनमताने झाल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. या प्रकरणाची ‘एस्.आय.टी.’च्या वतीने चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. आमदार संजय केळकर यांनी हा विषय सातत्याने विधानसभेत मांडून दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर केला. यानंतर या गंभीर गोष्टी उघड झाल्या आहेत.
संपादकीय भूमिका :या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! |