पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला
रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई !
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी (वय ३३ वर्षे ) याला ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज २२ जून या दिवशी सापळा रचून कह्यात घेतले.
अश्विन नंदगवळी या तलाठ्याने १ जून या दिवशी तक्रारदार आणि त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून चिपळूणच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून बिनशेती जमीन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरता त्या कार्यालयातील कर्मचारी यांच्यासाठी ४० सहस्र रुपये आणि वेगळा सात-बारा देण्याकरता मंडळ अधिकारी यांच्यासाठी ५ सहस्र रुपये असे एकूण ४५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. यानंतर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून नंदगवळीला प्रत्यक्ष लाच घेतांना कह्यात घेतले
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे आणि अन्य पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा लाचखोरीला काही प्रमाणात तरी आळा बसेल ! |