धर्मांतरितांचे शुद्धीकरण केल्यानंतर कायदेशीर वैधता प्राप्त होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी ! – अधिवक्ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा
रामनाथी, २२ जून (वार्ता.) – धर्मांतरितांची शुद्धीकरण प्रक्रिया (घरवापसी) या सर्व गोष्टी कायद्यांतर्गत येणारी कार्ये आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम २५ नुसार भारत एक धर्मनिरपेक्ष देश असल्याने कोणत्याही व्यक्तीला वेगळा धर्म स्वीकारण्याची मुभा आहे. तसेच त्याचा प्रसार-प्रचारही करता येतो. हे कलम ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासह हिंदूंनाही लागू आहे.
धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यासाठी धार्मिक विधींसह काही नियम बनवले पाहिजेत. ज्याची शुद्धीकरण प्रक्रिया राबवायची आहे, त्याचे ओळखपत्र, निवडणूकपत्र, रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे घ्यावी. त्यानंतर ‘माझे सनातन हिंदु धर्माविषयी आकर्षण असल्याने मी हा धर्म स्वीकारत आहे’, अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. त्यानंतर शुद्धीकरणाचा विधी करावा. त्यानंतर ‘ॲफिडेविट’ (प्रतिज्ञापत्र) बनवावे. त्याने नवीन नाव धारण केल्यावर त्याला ‘गॅझेट पब्लिकेशन’ (हिंदु धर्म स्वीकारल्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून निवेदन देणे) करायला सांगितले पाहिजे. या सर्व प्रक्रियेमुळे कागदोपत्री माहिती एकत्रित होते. आतापर्यंत लक्षात आले आहे की, हिंदूंचे अन्य पंथात धर्मांतर झाल्याची कागदपत्रे मिळतात; पण हिंदु धर्मात ‘घरवापसी’ झाल्याची कागदपत्रे बहुदा मिळत नाहीत. त्यामुळे कागदोपत्री माहितीला जमा करण्याला महत्त्व आहे. या संदर्भातील कायदा करण्यासाठी ही माहिती कालांतराने सरकारला देता येते. एखाद्या सरकारने घरवापसी बंदीचा कायदा आणला, तर तो कायदा रहित होऊ नये, यासाठी या माहितीचा उपयोग होईल. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेचे दस्ताऐवजीकरण असणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी (२२.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
अधिवक्ता नागेश जोशी पुढे म्हणाले,
१. शुद्धीकरण झाल्यावर त्या व्यक्तीला आपल्या न्यासाचे किंवा संघटनेचे एक प्रमाणपत्र देऊ शकतो.
२. हिंदु धर्मानुसार शुद्धीकरणाचे सर्व विधी केल्याने या गोष्टींचा त्याच्यावर धार्मिक संस्कार होतो. त्यामुळे तो आपल्याशी जोडलेला राहतो.
३. ज्याचे शुद्धीकरण केले, त्याची जन्मकुंडली, गोत्र, नाव आदी गोष्टी बनवल्या पाहिजे.
४. त्याचे नवीन आधार कार्ड, रहिवासी पुरावा, निवडणूक पत्र नव्याने बनवावे. हा ‘गॅझेट’ त्याच्या आणि आपल्या जवळ ठेवावा.
५. सार्वजनिक कार्यक्रमांना त्याला बोलावले पाहिजे. त्याच्याकडून थोडे शूल्क घ्या आणि त्याला पावती द्या. त्याचा रेकॉर्ड बनतो.
आपण आपल्या परंपरांच्या क्षेत्रात राहून काम केल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.