इराणमध्ये भारतीय दांपत्याचे अपहरण करणार्‍या पाकिस्तानी दलालास अटक !

  • गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांगवी यांच्या तत्परतेमुळे लगेच कारवाई !

  • दांपत्याला जायचे होते अमेरिकेला !

कर्णावती (गुजरात) – इराणची राजधानी तेहरान येथे एका पाकिस्तानी दलालाने पटेल नावाच्या गुजराती दांपत्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. दलालाने त्यांच्यावर ब्लेडद्वारे आक्रमण करून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांना पुष्कळ मारहाणही केली. त्यांच्या भारतातील कुटुंबियांकडे पैशांची मागणी करण्यासाठी मारहाणीचा व्हिडिओ पाठवला. कुटुंबियांनी यासंदर्भात गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांगवी यांच्याकडे साहाय्य मागितले असता त्यांनी त्वरित कारवाई करत दांपत्याला सोडवण्यासाठी साहाय्य केले.

१. सांगवी यांनी यासंदर्भात इराणच्या दूतावासाशी संपर्क साधला. दूतावासाने त्वरित तेहरान पोलिसांना सूचित केल्याने पोलिसांनी पाकिस्तानी दलाल आणि त्याचे साथीदार यांना अटक केली अन् अपहरण केलेल्या दांपत्याची सुटका केली.

२. पंकज आणि त्यांची पत्नी निशा पटेल यांना मुळात अमेरिकेला जायचे होते. त्यांच्याकडे त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नव्हती. अशातच भाग्यनगर येथील एका दलालाने त्यांना फसवून इराणला पाठवून तेथून अमेरिकेला जायची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार हे दांपत्या इराण येथील विमानतळावर उतरल्यावर संबंधित पाकिस्तानी दलालाने त्यांचे अपहरण केले आणि त्यांच्या भारतातील कुटुंबियांकडे खंडणी मागितली.