उद्योगपतींनी साधना केल्यास त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल ! – रवींद्र प्रभूदेसाई, संचालक, पितांबरी उद्योगसमूह

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ षष्ठम दिवस – मान्यवरांचे विचार

रामनाथ (फोंडा), २१ जून (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनामुळेच व्यवसाय करतांना धर्मसेवा करू शकतो. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला ‘उद्+योजक = उद्योजक’ अशी उद्योगाची व्याख्या सांगितली. ते म्हणाले होते की, ‘ज्याने ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होते, त्याला धर्म म्हणतात. आज कलियुगामध्ये अर्थशक्तीचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे अर्थशक्तीकडे दुर्लक्ष केल्यास आपली हानी होऊ शकते. तुमच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे, ही तुमचे दायित्व आहे.’

श्री. रवींद्र प्रभूदेसाई

आमचे ‘पितांबरी’ पावडर हे उत्पादन देवतांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येते. त्यानंतर आम्ही पूजेच्या संबंधित विविध उत्पादनांची निर्मिती केली.
‘जो ईश्‍वराची माहिती समाजापर्यंत पोचवतो, तो देवाला अधिक आवडतो.’ ‘शनीची साडेसाती दूर करण्यासाठी शनीची उपासना केली जाते’, हे लक्षात घेऊन आम्ही ‘शनि उपासना’ या उदबत्तीच्या उत्पादनाची निर्मिती केली. त्याच्या वेष्टनावर ‘शनीची उपासना कशी करावी ?’, याविषयी माहिती दिली. आपणही आपल्या उत्पादनांच्या वेष्टनावर आनंदप्राप्ती करण्यासाठी कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगणारी माहिती देऊ शकता. त्यामुळे सहस्रो लोकांपर्यंत साधना पोचू शकेल. सध्या प्रत्येक जण व्यस्त असतो. त्यांना वाटते, ‘साधना करणे, हे म्हातारपणी करण्याचे काम आहे’ व्यावसायिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, व्यवसाय करतांना अनेक अडचणी येतात. त्या सर्व अडचणी साधना केल्याने देवाच्या कृपेने सुटण्यास साहाय्य होऊ शकते. माझ्या आस्थापनातील सर्व १५ विभागांमध्ये कर्मचार्‍यांकडून प्रतिदिन वैश्‍विक प्रार्थना आणि मारुतिस्त्रोत्र म्हणवून घेतले जाते. यासह १ सहस्र ५०० कर्मचार्‍यांना सत्संग मिळण्याची नियोजन केले आहे. आपल्या आस्थापनातील कर्मचारी सात्त्विक असतील, तेथे भ्रष्टाचार होणार नाही. त्यांच्याकडून साधना करवून घेतल्यामुळे आपला नफा वाढतो, तसेच हिंदु धर्माची सेवा होते.