यंदा गणेशचतुर्थीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना थारा नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्तकला महामंडळ
पेडणे, २० जून (वार्ता.) – पर्यावरणाला हानी पोचू नये, याची दक्षता राज्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकार घेत असतात आणि त्याच प्रकारे गणेशभक्तांनी कोणत्याही परिस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी करू नये. राज्यात, तसेच पेडणे तालुक्यात गणेश शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे. वारखंड, पेडणे येथे हस्तकला महामंडळाच्या वतीने हातमाग केंद्र उभारण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी महामंडळाचे संचालक महादेव गवंडी यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. यामुळे या मूर्तींचे विडंबन होते आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामुळे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विक्री रोखण्यासाठी हस्तकला महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील रहाणार आहेत.’’