गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे

शिवप्रेमींची क्षमा मागितली

कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १० दिवसांत हटवा – कळंगुट पंचायत

कळंगुट, २० जून (वार्ता.) – कळंगुट पंचायतीने कळंगुट पोलीस ठाण्यासमोर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अवैध ठरवून तो १० दिवसांच्या आत हटवण्याचा आदेश १९ जून या दिवशी काढला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेले शिवप्रेमी २० जून या दिवशी सकाळी कळंगुट येथे मोठ्या संख्येने जमले. यामुळे कळंगुट परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेची नोंद घेऊन उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी. यांनी पंचायतीला संबंधित निर्णय स्थगित ठेवण्याचा आदेश दिला; मात्र ‘हा निर्णय पंचायतीने रहित करावा आणि सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येऊन क्षमा मागावी’ या मागण्यांसाठी कळंगुट पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले. शेवटी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सायंकाळी ५.३० वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात पंचायत कार्यालयाबाहेर येऊन आदेश रहित केल्याचे आणि या प्रकरणी शिवप्रेमींची क्षमा मागत असल्याचे घोषित केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटवण्याचा आदेश काढल्यानंतर शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष

१. कळंगुट पंचायतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटवण्याचा आदेश काढल्यानंतर शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. शिवप्रेमी सकाळी श्री शांतादुर्गा मंदिरात एकत्र आले होते. देवीला गार्‍हाणे घालण्यात आल्यानंतर तेथून त्यांनी पंचायतीकडे  मोर्चा वळवला. या वेळी शिवप्रेमींनी हातात भगवे ध्वज घेतले होते. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच पंचायतीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. शिवप्रेमींनी कार्यालयात प्रवेश करू नये, यासाठी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी पंचायतीत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली.

२. या प्रसंगी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी., पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, विश्वेश कर्पे, निरीक्षक परेश नाईक, अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रवीण गावस या वेळी घटनास्थळी उपस्थित होते. वाद चिघळू नये, यासाठी त्यांनी शिवप्रेमींशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

३. आंदोलन चालू असतांना कळंगुट येथील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हटवण्याचा आदेश दिल्याच्या प्रकरणी सरपंच सिक्वेरा यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी करत शिवप्रेमी आक्रमक झालेले असतांना पंचायतीच्या समोर सरपंच सिक्वेरा यांचे समर्थक आले. या वेळी दोन्ही गटांत बाचाबाची झाली आणि एकमेकांवर बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला. (पोलीस आधीच तेथे उपस्थित असतांना असे प्रकार कसे घडतात ? – संपादक)

४. शिवप्रेमींनी सकाळपासून सायंकाळपर्यंत पंचायतीसमोर शिवरायांचा जयघोष करत आणि पंचायतीचा निषेध करत सरपंचांनी क्षमा मागण्याच्या अटीवर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना सकाळपासून सायंकाळपर्यंत पंचायत कार्यालयातच रहाण्यास भाग पाडले. पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पंचायतीचे शटर बाहेरून बंद केले आणि पंचायतीच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. चर्चेसाठी सरपंच सिक्वेरा येत नसल्याचे पाहून काही संतप्त नागरिकांनी पंचायत कार्यालयावर दगडफेक केली.

५. शेवटी सायंकाळी ५.३० वाजता सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी कडक पोलीस बंदोबस्तात पंचायतीच्या बाहेर येऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतल्याचे आणि या आदेशामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो’, असे घोषित केले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

 (सौजन्य : In Goa 24×7)

संपादकीय भूमिका

धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !