पर्यटकांसाठी वासोटा गड बंद !

सातारा, २० जून (वार्ता.) – जिल्‍ह्यातील घनदाट जंगलराजीत वसलेला दुर्गम वासोटा गड १६ ऑक्‍टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवला आहे. १६ ऑक्‍टोबरनंतर पावसाची स्‍थिती पाहून गड पुन्‍हा चालू करायचा कि नाही याविषयी निर्णय घेण्‍यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्‍यास कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

मोहिते पुढे म्‍हणाले की, बामणोलीपासून शिवसागर जलाशयापलिकडे जिल्‍ह्यातील घनदाट कोयना अभयारण्‍यात सह्याद्री व्‍याघ्र प्रकल्‍पात वासोटा हा गिरीदुर्ग आहे. घनदाट झाडी, कठीण चढण यांमुळे हा गड पर्यटक, शिवभक्‍त यांना नेहमीच खुणावत असतो. पाण्‍याची टाकी, राजवाड्याचे भग्‍नावशेष, मंदिर आणि बाबूकडा ही गडावरील वैशिष्‍ट्ये आहेत. या परिसरातील झाडी आणि पशू-पक्षी यांच्‍या अभ्‍यासासाठी निसर्ग अभ्‍यासकही मोठ्या प्रमाणात येतात. पावसाळा संपल्‍यानंतर पर्यटकांना वासोटा गडाचे वेध लागतात; मात्र पावसाळ्‍यात येथे जोरात वारा वहातो. पाऊसही जोरात पडतो. शिवसागर जलाशय तुडुंब भरून जातो.

या काळात जलाशयात जाणे धोकादायक ठरू शकते. बामणोली परिसरातील सर्व पर्यटन व्‍यावसायिक ‘बोट क्‍लब’नाही याविषयीची सूचना वनविभागाकडून देण्‍यात आली आहे.