‘धर्मासाठी कार्य करणे आवश्यक आहे’, हेही ज्ञात नसलेले तथाकथित हिंदु धर्माभिमानी !
‘बरेच तथाकथित हिंदु धर्माभिमानी ‘गोशाळा आणि मंदिरे बांधणे, तसेच हिंदूंच्या बैठका, मंदिरांत भजन, कीर्तन, प्रवचने आणि ‘लव्ह जिहाद’विषयी व्याख्याने आयोजित करतात आणि त्यांना ‘मी हिंदु धर्मासाठी मोठे कार्य करतो’, असे वाटते; पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून काहीच कार्य झालेले नसते.
गेल्या काही वर्षांत झालेल्या काही हिंदु अधिवेशनांमध्ये आलेल्या काही हिंदु धर्माभिमान्यांचे अनुभव पुढे दिले आहेत.
१. हिंदु धर्माभिमान्यांचा अहंकार !
अ. हिंदु धर्मासाठी अत्यल्प कार्य करणारे एक कीर्तनकार हिंदु अधिवेशनात ‘आम्ही केवढे मोठे कार्य करतो !’, हे सांगत असतात.
आ. देशाच्या एका समस्येच्या संदर्भात कार्य करणार्या एका अधिवक्त्यांच्या भाषणामध्ये ‘मी हे केले, मी ते केले’, अशी मीपणाची सूत्रे असतात. प्रत्यक्षात अनेक हिंदुत्ववाद्यांचे कार्य त्यांच्यापेक्षा कैक पटींनी अधिक आहे.
२. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी साधनेचे महत्त्व न समजलेले आणि त्यामुळे दिशाहीन झालेले हिंदुत्वनिष्ठ !
अ. एका विचारवंतांनी ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करणार्या हिंदु नेत्यांनी साधनेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा राजकीय प्रभाव निर्माण करून राजकीय पक्षांना हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी बाध्य केले पाहिजे’, असे मत व्यक्त केले.
आ. ‘राजकीय माध्यमांतून हिंदु राष्ट्र येईल’, ‘घरवापसी’ केली, तरच हिंदु राष्ट्र येऊ शकते’, ‘केवळ नामजप केला की पुरे, हिंदु राष्ट्र येईल’, असेही काही जणांचे म्हणणे असते. इ. हिंदुत्वाच्या कार्यासाठी व्यवसाय बंद करणारे एक बुद्धीजीवी ‘बौद्धिक स्तरावर हिंदु राष्ट्र होणार’, असे विश्लेषण करत होते. ‘आध्यात्मिक स्तरावर काही होणार नाही’, असे त्यांचे म्हणणे होते.
ई. एक स्वेच्छानिवृत्त सनदी प्रशासकीय अधिकारी ‘भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी समाजातील लोक साधक होणे महत्त्वाचे आहे’, हे समजून घेण्यापेक्षा राजकीय निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. यासाठी त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
उ. ‘एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले की, हिंदु राष्ट्र स्थापन होणार’, असे मत एक हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते मांडतात.
ऊ. ‘कायद्यात सुधार केला की, हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य होईल’, असे एक हिंदुत्वनिष्ठ म्हणतात.
ए. काही धर्मप्रेमींना वाटते, ‘आता युद्धाचा काळ जवळ आला आहे. आता सनातनचे साधक साधना काय सांगतात ? आता साधना करून काही उपयोग नाही.’
३. हिंदु अधिवेशनांच्या कालावधीत मला भेटायला आलेले बरेच जण साधना न करणारे आणि अहंभावी असतात.
हिंदूंच्या अधोगतीचे मुख्य कारण, म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव. हिंदु धर्मासाठी खरे कार्य, म्हणजे स्वतः साधना करून हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून साधना करून घेणे. हे तथाकथित हिंदु धर्माभिमानी करत नसल्याने त्यांच्याकडून धर्मरक्षणाचे काहीच कार्य होत नाही.
हिंदूंच्या रक्षणासाठी ‘हिंदूंकडून धर्माचा अभ्यास आणि साधना करून घेणे’ अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने हिंदु जनजागृती समिती ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आणि सनातन संस्था सत्संग घेत आहे.
साधना केल्याने आपल्याला ईश्वरी आशीर्वाद, तसेच देवतांची शक्ती मिळते आणि कार्य अधिक प्रभावी अन् फलनिष्पत्तीदायी होते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यामुळे ज्यांना ‘धर्मासाठी काही करावे’, असे वाटते’, त्यांनी स्वतःच्या मनाने काही करण्यापेक्षा धर्मशिक्षणवर्ग किंवा सत्संग यांत शिकवल्याप्रमाणे साधना करावी. वानरांनी रामनाम घेत दगड पाण्यात टाकल्यावर ते तरंगले आणि त्यातूनच रामसेतूची निर्मिती झाली. या उदाहरणातून बोध घेऊन आपण साधना म्हणून नामजप करत कार्य केल्यास हिंदु धर्माच्या रक्षणाचे आणि प्रचाराचे योग्य कार्य लवकर होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले