कोरोनाच्या काळात भाग्यनगर सेवाकेंद्रामध्ये निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !
‘मार्च २०२१ मध्ये भाग्यनगर सेवाकेंद्रात आम्ही ५ साधक होतो. त्या वेळी सेवाकेंद्रातील एकेक साधक आजारी पडू लागला. गुरुदेवांच्या कृपेने त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळाली. हा अनुभव गुरुदेवांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करते.
१. सेवाकेंद्रात दोनच खोल्या असल्याने रुग्णाईत साधकांचे अलगीकरण करण्यास अडचण येणे
मार्च २०२१ मध्ये प्रथम एक साधिका रुग्णाईत झाली. सेवाकेंद्रात दोनच खोल्या आहेत. एका खोलीत रुग्णाईत साधिकेचे अलगीकरण करायचे होते. तेव्हा त्या खोलीतील साधकांना बैठकीच्या खोलीत रहावे लागले. ती साधिका बरी झाल्यानंतर दुसरा एक साधक रुग्णाईत झाला. त्यामुळे त्याची अलगीकरणाची व्यवस्था त्याच खोलीत केल्यामुळे काही साधकांना बैठकीच्या खोलीतच रहावे लागत होते. त्यांच्यामध्ये एक वयस्कर काकाही होते.
२. रुग्णाईत साधकांची सुश्रूषा आणि सेवाकेंद्रातील सेवा करतांना अन्य समष्टी सेवा करू न शकणे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गुरुदेवांनी मनाची सिद्धता करून घेणे
रुग्णाईत साधकांची सुश्रूषा, सेवाकेंद्रातील स्वच्छता अन् स्वयंपाक, या सेवा दोन साधिकांना कराव्या लागल्या. आम्हाला एवढी शारीरिक सेवा करण्याची सवय नव्हती. ‘केवळ गुरुदेवांच्या कृपेने शक्ती मिळाल्यामुळे आम्ही या सेवा करू शकलोे’, असे मला वाटले. सर्व साधकांना उपाय म्हणून ३ – ४ घंटे नामजप करायला सांगितले होते. ‘तेसुद्धा परात्पर गुरु डॉक्टरच करून घेत होते’, असे मला जाणवले. त्या वेळी रुग्णाईत साधकांची सुश्रूषा आणि सेवाकेंद्रातील सेवा, एवढेच आम्ही करू शकत होतो. आम्ही अन्य समष्टी सेवा करू शकलो नाही. त्या वेळी ‘हीच आमची समष्टी सेवा आहे’, हे मनाला समजावून ‘त्या परिस्थितीचा सामना करणे आणि मन स्थिर ठेवणे’, हीच साधना आहे’, अशी आमच्या मनाची सिद्धता गुरुदेवांनी करून घेतली होती.
३. मनाची स्थिती अस्थिर झालेली असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याचे जाणवणे
ज्या वेळी माझ्या मनाची स्थिती अस्थिर झाली, त्याच वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून मला पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा मिळाली’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या मनाला पुन्हा उभारी आली.
४. अलगीकरणासाठी वेगळी खोली नसल्याने रुग्णाईत वयस्कर काकांना बैठकीच्या खोलीतच एक कोपर्यात झोपवणे, त्यांचे रक्षण करण्यासाठी गुरुदेवांना प्रार्थना करणे अन् गुरुकृपेने काका ५ – ६ दिवसांत बरे होऊ लागणे
अशा स्थितीत २ वयस्कर साधकसुद्धा रुग्णाईत झाले. त्या वेळी आमच्या जवळ गुरुदेवांचा धावा करण्याविना काहीच पर्याय नव्हता. अलगीकरणात ठेवण्यासाठी खोली उपलब्ध नसल्याने एका खोलीत काकूंना अलगीकरणात ठेवले; परंतु ‘काकांच्या संदर्भात काय करायचे ?’, हे कळत नव्हते. सेवाकेंद्राच्या बैठकीच्या खोलीतच एक कोपर्यात काकांना झोपवले. आम्ही गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, या काकांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था नाही, तरी ‘आपणच कसे करायचे ?’, ते सुचवावे.’ त्यांच्या चारही बाजूंना उपायांसाठी खोकी लावली. ‘काकांसाठी हीच खोली आहे. गुरुदेवा, आपणच त्यांचे रक्षण करावे’, अशी प्रार्थना केली. केवळ गुरुदेवांच्या कृपेने काकांचे आजारपण ५ – ६ दिवसांत न्यून होऊ लागले.
५. प्रतिदिन नवीन समस्या आल्यावर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अखंड स्मरण अन् प्रार्थना होणे आणि त्यामुळे समस्येचा सामना करण्याची शक्ती मिळणे
प्रतिदिन उठल्यानंतर एक नवीन समस्या उभी रहात होती. समस्येचा सामना करण्यासाठी केवळ गुरुदेवांनीच आम्हाला शक्ती दिली. या समस्या आल्यावर आमच्याकडून गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अखंड स्मरण अन् प्रार्थना होत होती. त्यामुळेच आम्ही या परिस्थितीचा सामना करू शकलो. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
‘हे गुरुदेवा, आमची काहीच क्षमता नसतांना ‘आपत्काळातील सेवा कशा असतात आणि त्या कशा करायच्या ? भगवंताच्या भक्तीविना आपण जिवंत राहू शकत नाही’, हे तुम्ही आम्हाला शिकवले’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर सेवाकेंद्र (२३.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |