वारकर्यांनी पाणी वापरासाठी कालव्याच्या घाटांचा उपयोग करावा ! – जलसंपदा विभागाचे आवाहन
बारामती – शहरात नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले असल्याने पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकर्यांनी पाण्याच्या वापरासाठी घाटांचा उपयोग करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता अश्विन पवार यांनी केले आहे. सध्या कालवा पूर्ण क्षमतेने चालू आहे. अस्तरीकरण झाले असल्याने पाण्याचा वेग अधिक आहे. जलसंपदा विभागाने आवश्यक ती काळजी घेतली आहे; पण वारकर्यांनी आंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी कालव्यात न उतरता आवश्यकता वाटल्यास घाटांचा उपयोग करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. नीरा डाव्या कालव्यावर ५ ते ६ ठिकाणी पायर्या असलेले घाट आहेत. जलसंपदा विभागाने जागोजागी फलक लावून जनजागृतीही केली आहे. नगरपरिषदेच्या जीव रक्षकांसमवेत जलसंपदा विभागाचे कर्मचारीही थांबणार आहेत. वारकर्यांना वारीदरम्यान पाण्याची कमतरता भासणार नाही. पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वारकर्यांनी काळजी घ्यावी, असेही जलसंपदा विभागाने सांगितले आहे.