दुचाकीची चावी काढून घेण्‍याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही ! – मुंबई सत्र न्‍यायालय

दुचाकीची चावी काढून घेण्‍याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही

मुंबई – वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दुचाकीची चावी काढून घेण्‍याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नसल्‍याचे मुंबई सत्र न्‍यायालयाने म्‍हटले आहे, तसेच ‘चालक परवाना (ड्रायव्‍हिंग लायसन्‍स) जमा केल्‍यानंतर दंडवसुलीसाठी चालकाला वाहतूक पोलीस ठाण्‍यात येण्‍याची सक्‍ती करू शकत नाहीत’, असेही न्‍यायालयाने म्‍हटले आहे. मुंबईतील कुलाबा परिसरात ६ वर्षांपूर्वी एका तरुणावर वाहतुकीच्‍या नियमांचा भंग केल्‍याप्रकरणी दंडवसुलीची कारवाई झाली होती. तरुणाने चालक परवाना जमा केल्‍यानंतर त्‍याला पोलीस ठाण्‍यात नेण्‍यात आले होते. यासंबंधीच्‍या खटल्‍यात निकाल देतांना न्‍यायालयाने वरील आदेश दिले आहेत. सबळ पुराव्‍याअभावी आरोपी तरुणाची निर्दोष सुटका झाली. परवाना जमा केल्‍यानंतर नियम भंग करणार्‍या चालकाला वाहतूक पोलीस ठाण्‍यात येण्‍याची सक्‍ती करता येणार नाही, असे मत न्‍यायालयाने नोंदवले.