भारताला गुलाम करण्यासाठी इंग्रजांनी ‘गुरुकुल परंपरा’ मोडीत काढली ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
पुणे येथील श्रीसमर्थ श्रीरामदासस्वामी’ पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे – वर्ष १८०० पूर्वी आपली शिक्षणपद्धती अत्यंत समृद्ध होती. त्या काळी ७० टक्के लोक सुशिक्षित म्हणजे नीतीवान आणि संस्कारित होते. देशातील प्रत्येक गावामध्ये १ गुरुकुल होते, अशी नोंद ब्रिटिशांनीच करून ठेवली आहे. यातून नैतिकता जोपासणारी, नीतीवान माणसे सिद्ध होत होती, हेच भारताचे सामर्थ्य आहे, याची जाण इंग्रजांना होती; म्हणून त्यांनी भारताला गुलाम करण्यासाठी गुरुकुल परंपरा मोडीत काढली, असे मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले. श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने श्रीसमर्थ वाङ्मय आणि विचारांचा प्रसार उत्कटपणे करणार्या व्यक्ती किंवा
संस्थेला प्रतिवर्षी ‘श्रीसमर्थ श्रीरामदासस्वामी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. वर्ष २०२०-२०२१ या वर्षीचा २८ वा पुरस्कार ‘समर्थ व्यासपीठ पुणे’ या संस्थेला देण्यात आला. १८ जून या दिवशी फडके हॉल, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगडच्या वतीने देण्यात येणारा श्री समर्थ रामदासस्वामी पुरस्कार पुण्यातील समर्थ व्यासपीठाला जाहीर झाला होता. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.… pic.twitter.com/U04OsHzz4e
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 18, 2023
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते दिलेला पुरस्कार ‘समर्थ व्यासपीठ, पुणे’चे डॉ. राम साठे यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला संस्थानचे विश्वस्त डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, अधिवक्ता महेश कुलकर्णी आणि डॉ. अनंत निमकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे, ‘शंकर महाराज मठा’चे विश्वस्त कुलकर्णी, तसेच अन्य उपस्थित मान्यवरांचा समर्थांचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
हिंदू स्वत:च्या संस्कृतीपासून दूर गेल्याने समाजामध्ये अराजकता, हिंसा वाढली ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
या वेळी उपस्थित उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ब्रिटिशांनी जातांना सर्वच लुटून नेले. हिंदु परंपरा, संस्कृती यांतून मिळणारे शिक्षण हे मूल्यशिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण होते. त्यामुळे प्रामाणिक आणि कष्ट करणारी माणसे सिद्ध होत होती. आजच्या स्थितीत जगातील कितीतरी नामवंत ‘कॉर्पोरेट कंपन्यां’मध्ये भारतीय लोकच आहेत. हिंदु संस्कृती ही माणसातील ‘देवत्व’ ओळखणारी आहे. आपण आपल्या संस्कृतीपासून दूर गेल्याने आज आपल्याला समाजामध्ये अराजकता, हिंसा, दुराचार वाढल्याचे दिसून येत आहे.
या प्रसंगी समर्थ व्यासपिठाच्या प्रतिनिधींनी त्यांचे विचार मांडले. समर्थांचे वंशज श्री. बाळासाहेब सुखी स्वामी यांनी सज्जनगड संस्थानचा इतिहास सांगितला. डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी पुरस्काराच्या स्वरूपाविषयी माहिती दिली. डॉ. अनंत निमकर यांनी पुरस्कारा समवेत दिल्या जाणार्या ‘गौरव पत्रा’चे वाचन केले.
समर्थ व्यासपिठाच्या सौ. स्वाती वाळिंबे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, श्रीसमर्थ वाङ्मय आणि विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व्यासपीठ गेले २७ वर्षे करत आहे. आज या कार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोणतेही कार्य करतांना अनेक संकटे येतात; पण त्याला तोंड द्यायचे असेल, तर सक्षम व्हावे लागेल. धोरण कोणते असावे ? हेसुद्धा समर्थांनी शिकवले आहे. राममंदिर तर उभे रहातच आहे; पण आता रामराज्य निर्माण करायचे आहे, या उद्देशाने हे व्यासपीठ काम करणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिनगुरुजी आणि उल्हासगुरुजी यांनी मंत्रपठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहित जोगळेकर यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. भूषण स्वामी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘कल्याण करी रामराया’ या गीताने करण्यात आली.