‘आणीबाणी’ची पन्नाशी : कोकणातील सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश होणार !
‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन केंद्रा’च्या अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा उपक्रम
चिपळूण – वर्ष २०२५ मध्ये आणीबाणीला ५० वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश सिद्ध (तयार) करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन केंद्राच्या अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राने हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या माहितीकोशाचे संपादन वाचनालयाचे ‘समन्वयक’ प्रकाश देशपांडे करणार आहेत. राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील खेडेकर हे या प्रकल्पाचे सहसंपादक, तर माहितीकोश निर्मितीचे समन्वयक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश (बापू) काणे काम पहाणार आहेत.
आणीबाणीच्या काळात सर्व नागरी अधिकार (हक्क) स्थगित करण्यात आले होते. वृत्तपत्रांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला कारागृहात कैद करण्यात आले होते. देशभर या हुकूमशाहीच्या निषेधार्थ आंदोलने चालू झाली होती. सत्याग्रह आणि मोर्चे काढण्यात आले होते. सत्ताधार्यांनी अतिशय कठोरपणे ही आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केले होते. कित्येकांना ‘मिसा’ कायद्याखाली तुरुंगात टाकले होते. कोकणातील जवळपास ८०० कार्यकर्ते आणीबाणीत विविध कारागृहांत होते. या कोशाच्या निमित्ताने मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील आणीबाणी सत्याग्रहात भाग घेतलेल्या आणि ‘मिसा’बंदीत कारागृहात राहिलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची छायाचित्रे, त्यांनी कुठे सत्याग्रह केला होता ? कोणत्या कारागृहात शिक्षा भोगली होती? ‘मिसा’बंदींना कुठे अटक करण्यात आली होती? आदी माहितीचे संकलन केले जाणार आहे.
हा इतिहास पुढच्या पिढीला कळावा म्हणून ‘लोटिस्मा’ ने हे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘सर्वांनी सहकार्य करावे’, असे आवाहन ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि पत्रव्यवहारासाठी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, श्री जुना भैरी मंदिरासमोर, चिपळूण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे संपर्क साधावा.