गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा !
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे महामार्ग अधिकार्यांना आदेश
रत्नागिरी – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संथगतीने चालू असलेल्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या मार्गाचे काम अजूनही संथगतीने चालू असून या कामाला गती देऊन गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा, असा आदेश त्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिला आहे. महामार्गाच्या कामाच्या प्रगतीसंदर्भात मंत्री चव्हाण यांनी मंत्रालयात महामार्गाच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड येथील रस्त्याच्या या कामांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक निधीविषयीच्या ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल; परंतु या मार्गाची किमान एक बाजू तरी चालू करण्यात यावी, तसेच कशेडी बोगद्यातील अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून महामार्गाची एक बाजू गणेशोत्सापूर्वी वाहतुकीसाठी खुली करावी, असेही निर्देशही मंत्री चव्हाण यांनी अधिकार्यांना दिले.