ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था
रामनाथ देवस्थान – हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व धर्माचरण आणि आध्यात्मिक साधना केल्याने अनुभवास येते. त्या वेळी आपल्यामध्ये खरा धर्माभिमान निर्माण होतो. त्यानंतर समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे खरे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. धर्माचरण आणि आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्ती पवित्र होते. धर्माभिमानी व्यक्ती धर्माचा अनादर करत नाही आणि इतरांना तसे करू देत नाही. तसेच होणारी धर्महानी थांबवते. अशीच व्यक्ती धर्मरक्षणाचे कार्य करू शकते. यावरून असे लक्षात येते की, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य केवळ धर्माचे पालन करणारे आणि आध्यात्मिक साधना करणारे हिंदूच करू शकतात अन् रामराज्य आणू शकतात, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
सद्गुरु नंदकुमार जाधव या वेळी म्हणाले, ‘‘एवढेच नाही, तर आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम केल्याने निःस्वार्थ कर्मयोग होतो, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगतीही होते. धर्मरक्षणाचे कार्य अशी व्यक्तीच करू शकते. यावरून असे लक्षात येते की, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य केवळ धार्मिक आणि साधना करणारे हिंदूच करू शकतात.’’