राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना जनतेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न ?
मानवाला भौतिक जीवन सुखाने जगण्यासाठी भौतिक वस्तूंची नितांत आवश्यकता असते. हे आपण शाळेत शिकत असतांना ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत’, अशा वचनातून शिकलो. केवळ भौतिक जीवन सुखाचे असू शकत नाही. ‘अनेक भौतिक वस्तूंचा संग्रह आहे म्हणून माणूस सुखी आहे’, असे म्हणता येत नाही.
१. मानवी जीवनातील महत्त्वाचे आधारस्तंभ
मानवाचे जीवन हे केवळ भौतिक वस्तूंशी निगडित असलेले जीवन नसून त्याला भावभावना आहेत. मानवी समाजाला परंपरा, इतिहास, संस्कृती यांचा वारसा लाभला आहे. या सर्वांमध्ये त्याच्या भावना गुंतलेल्या असतात. तसेच राष्ट्र ही संकल्पना मानवी समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती मानवाच्या भावनेतूनच निर्माण झाली आहे. संस्कृती, राष्ट्र आणि धर्म हे मानवी जीवनाचे ३ आधारस्तंभ आहेत. किंबहुना या ३ गोष्टी मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. त्याला वाळवी लागली अथवा त्या कमकुवत झाल्या, तर मानवी जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तसेच समाज, राष्ट्र आणि कुटुंबसंस्था या महत्त्वाच्या संस्था सुद्धा वैचारिक, भावनिक अन् बौद्धिक पातळीच्या सुदृढतेवर अवलंबून आहेत. अन्यथा मानवाचे जीवन असुरक्षित राहील.
२. मानव आणि मानवी जीवन यांविषयी दिली जाणारी शिकवण
‘जन्माला येणार्या कोणत्याही प्राण्याला, जिवाला सुरक्षितपणे जीवन जगता आले पाहिजे’, असा निसर्गाचा न्याय आहे. म्हणूनच निसर्गाने प्रत्येक प्राण्यात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही गुणवैशिष्ट्ये जन्मत:च निर्माण केली आहेत.
‘मानवी समाजात मात्र माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे म्हणून समाजातील बलवान, सुजाण आणि जाणत्या लोकांनी दुर्बल घटकांना आधार देऊन त्यांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करणे, हे सामाजिक अन् राष्ट्रीय कर्तव्य मानण्यात आले. या कर्तव्यापासून जो दूर जाईल, त्याला मानव म्हणता येणार नाही’, अशी शिकवण पिढ्यानपिढ्या आपल्याला देण्यात आली आहे.
मानवाच्या जीवनात असंख्य समस्या असतात. त्या समस्यांवर मात करण्यासाठी त्याला सक्षम आणि सबल करायचे असते. त्यासाठीच शिक्षण संस्था अस्तित्वात आल्या. मानवाचे व्यक्तिगत जीवन जसे आहे, तसेच त्याचे सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन आहे, अशी शिकवण याच शिक्षण संस्थांमधून अनंत काळापासून देण्यात येत आहे.
‘मानवाला दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणार्या सर्व गोष्टींची पूर्तता करता आली पाहिजे. जीवन जगण्यासाठी मूलभूत असलेल्या गोष्टी त्याला मिळाल्याच पाहिजेत, याविषयी वाद होण्याचे कारण नाही; पण तेवढ्याच गोष्टी म्हणजे त्याचे जीवन आहे’, असे म्हणता येणार नाही.
३. मानवाच्या दृष्टीने सुरक्षितता अधिक महत्त्वाची
माणूस हा अन्य प्राण्यांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ असा प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या श्रद्धास्थानांचा वारंवार होणारा अपमान, त्याच्या प्रियजनांची होणारी हत्या त्याला सुखाने जीवन जगू देत नाही. एवढेच नाही, तर त्याचे जीवन या घटनांमुळे उद़्ध्वस्त होऊन जाते. घरात कितीही भौतिक सुविधा असल्या, तरीसुद्धा त्या भौतिक सुविधा त्याला अशा परिस्थितीत सौख्य देऊ शकत नाहीत.
सामाजिक वातावरणात वावरतांना त्याला दबावाखाली वावरावे लागत असेल, तर अशा परिस्थितीत त्याच्यासमोर असलेली महत्त्वाची समस्या म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहिली पाहिजे. तिच्यावर आक्रमण होऊन तिची हत्या होता कामा नये. यापेक्षा अन्य कोणताही प्रश्न मानवाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा नाही; कारण हा प्रश्न केवळ एका कुटुंबाशी निगडित नाही. तो समाजातील प्रत्येक कुटुंबाला भेडसावत आहे. याचा परिणाम सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनावर मोठ्या प्रमाणात होतो.
४. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी लव्ह जिहादला फाजील म्हणून दुर्लक्ष करणे ही राजकीय अन् सामाजिक अपरिपक्वता !
समाजातील एका वर्गाची लोकसंख्या न्यून होणे, म्हणजे त्या विशिष्ट वर्गाचे समूळ उच्चाटन केल्यासारखे आहे. लव्ह जिहाद हा त्यातीलच एक प्रकार आहे. या लव्ह जिहादकडे पाठ फिरवून तो अस्तित्वात नाही, असे म्हटल्याने त्याचे अस्तित्व नष्ट होणार नाही. लव्ह जिहादची झळ हिंदु समाजाला होरपळून काढत आहे. हिंदु समाजाचे अस्तित्व त्यामुळे नष्ट होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या समाजाचे अस्तित्व नष्ट होणे यासारखी दुसरी कोणतीही चिंता निर्माण करणारी समस्या असू शकत नाही; कारण लव्ह जिहादमुळे हिंदु समाज समूळ नष्ट होण्याची समस्या निर्माण झाली आहे. ती समस्या अन्य समस्या किंवा प्रश्न यांपेक्षा नितांत महत्त्वाची आहे; कारण हिंदु समाजाचे अस्तित्व त्याचा धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांसह नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याचा अनुभव वारंवार येत असतांना सुद्धा ‘लव्ह जिहाद या प्रश्नाकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि गेली अनेक दशके राजकारणात सक्रीय सहभाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी ‘फाजील’ म्हणून त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, हे त्यांच्या राजकीय अन् सामाजिक परिपक्वतेचे प्रमाण नाही’, असा कुणाचा समज झाला, तर त्यात गैर नाही.
५. शरद पवारांच्या लव्ह जिहादच्या विधानामुळे सर्वसामान्य हिंदूंना सतावणारे प्रश्न
मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या समस्या शरद पवारांना अस्वस्थ करतात. याचा अर्थ त्यांचे मन, बुद्धी आणि विचार अत्यंत संवेदनशील असल्याची प्रचीती देतात; पण हिंदूंच्या होणार्या हत्यांमुळे त्यांचे अंतःकरण द्रवत नाही. ते कसे काय ? हा प्रश्न सामान्य माणसाला सतावत आहे.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास त्यांना अभिमानास्पद वाटत नाही का ? औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे शिवपुत्र शंभूराजांना हाल हाल करून मारले. त्या औरंगजेबाविषयी शरद पवारांना श्रद्धा का वाटते ? शंभूराजांचे बलीदान त्यांना लव्ह जिहादसारखेच फाजील वाटते का ? हिंदूंच्या जीवन मरणाच्या प्रश्नापेक्षा ‘औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतरण करण्यात आले’, हीच समस्या त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे का ? असे प्रश्न त्यांनीच केलेल्या विधानावरून सामान्य माणसाच्या मनात निर्माण होत आहेत.
‘महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद निर्माण करून सामाजिक सलोखा अबाधित रहाणार आहे’, असे त्यांना वाटते का ? ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजात फूट पाडणे, याचा अर्थ सामाजिक सलोखा साधणे असा होतो का ? असे अनेक प्रश्न शरद पवार यांनी ‘लव्ह जिहादसारख्या फाजील प्रश्नांना महत्त्व दिले जात आहे’, असे उद़्गार काढून सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. पालघरमध्ये पोलिसांच्या समोर २ हिंदु साधूंची हत्या झाली. त्या वेळी झालेले आक्रमण चिंताजनक आहे, असे शरद पवारांना वाटले नाही का ?
६. देशाचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कि औरंगजेब ?
औरंगजेबाचे केले जाणारे उदात्तीकरण हा शरद पवारांना चिंतेचा विषय वाटत नसेल, तर त्यांच्या दृष्टीने या देशाचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहेत कि औरंगजेब आहे ? हे त्यांनी स्पष्ट करावे आणि आमच्यासारख्या सामान्यजनांचा होणारा वैचारिक अन् मानसिक गोंधळ दूर करावा. जगातील अन्य राष्ट्रे त्यांच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन करत नाहीत. त्याचप्रमाणे परकीय राष्ट्राचा क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यकर्त्यांची भलावणही करत नाहीत.
७. …याचे उत्तर शरद पवार देतील का ?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी परस्त्रीला मातेसमान मानून आपला आदर व्यक्त केला. छत्रपती संभाजी राजांनीही मानवतेला काळीमा लागेल, असे वर्तन केले नाही; पण म्हणून मुसलमान समाज छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांचा जयजयकार करतांना आढळत नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब, अफझलखान, टिपू सुलतान अशा क्रूर आक्रमकांविषयी हिंदु समाजाला आपलेपणा आणि आपुलकी का वाटावी ? या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांनी द्यावे.
८. शरद पवारांना छत्रपती शिवराय, शंभूराजे यांपेक्षा औरंगजेब आदरणीय वाटतो का ?
जगातील इतर राष्ट्रांनी, ज्या आक्रमकांनी त्यांच्या राष्ट्राचा धर्म, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पोवाडे रचले नाहीत. त्यांच्या क्रौर्याला ‘शौर्य’ म्हणून वाखाणले नाही किंवा त्या क्रौर्याकडे दुर्लक्ष केले नाही. अशा परिस्थितीत हिंदुस्थानमधील नागरिकांनी मात्र इस्लामिक आक्रमकांच्या क्रौर्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा उदो उदो करावा, अशी अपेक्षा शरद पवारांची आहे का ? असा समज सर्वसामान्य जनतेने करून घ्यावा का ?
छत्रपती शिवराय, शंभूराजे यांपेक्षा औरंगजेब शरद पवारांना आदरणीय आणि वंदनीय वाटतो का ? असे प्रश्न सामान्य लोकांच्या मनात सहज निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे देऊन जनतेचा मानसिक आणि वैचारिक गोंधळ दूर करावा, एवढीच माफक अपेक्षा जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणार्या शरद पवारांकडून बाळगली जात आहे. जनतेचा भ्रम दूर करण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील, याविषयी खात्री आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (८.६.२०२३)