कठुआ बलात्कार प्रकरण म्हणजे हिंदूंना जम्मूतून हाकलून देण्यासाठीचे षड्यंत्र !- प्रा. मधु किश्‍वर, संपादक, ‘मानुषी’, देहली

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा चौथा दिवस

प्रा. मधु किश्‍वर

रामनाथ देवस्थान – वर्ष २०१८ मध्ये जम्मूतील रसाना नावाच्या लहानशा गावातील कथित बलात्कार प्रकरणाला ‘कठुआ बलात्कार’ प्रकरण म्हणून जगभर कुप्रसिद्धी देण्यात आली. देशभरातील सेक्युलरवाद्यांनी, बॉलीवूडच्या अभिनेत्यांनी आणि हिंदुविरोधकांनी या प्रकरणाचा वापर जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी केला. ‘हिंदूंनी पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली’, असे कथानक खोट्या पुराव्यांच्या आधारे बनवून त्याचा जगभर प्रचार केला. यामागे हिंदूंना अपकीर्त करण्याचे आणि काश्मीरनंतर जम्मूच्या क्षेत्रातून बाहेर काढण्याचे एक नियोजनबद्ध षड्यंत्र होते, असा आरोप दिल्ली येथील ‘द गर्ल फ्रॉम कठुआ’ या पुस्तकाच्या लेखिका आणि ‘मानुषी’च्या संपादिका प्रा. मधु किश्‍वर यांनी केला. त्या ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘कठुआ येथील सत्य’ या विषयावर बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की,

१. या प्रकरणात हिंदूंवर ‘गँगरेप’चा आरोप लावण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाल्याचा निष्कर्षच मान्य केलेला नाही. ‘संबंधित मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या तिची करण्यात आली’, असे पोलीस अन्वेषणात नमूद असतांना शवविच्छेदन अहवालात कुठेही कवटीला मार लागलेला दिसून आला नाही. अशा अनेक विसंगती त्या अहवालात आढळून आल्या आहेत.

२. कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख उघड करणे कायद्याने गुन्हा आहे; पण या प्रकरणामध्ये पीडितेचे छायाचित्र आणि नाव माध्यमांमधून जाणीवपूर्वक उघड करण्यात आले. या प्रकरणात तपासाच्या नावाखाली हिंदु युवकांचा छळ करण्यात आला. परिणामी कठुआतून अनेक हिंदु कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले.

३. त्या विरोधात जम्मूमध्ये ‘जम्मू बार असोशिएशन’ने सहस्रो हिंदूंसह जनआंदोलन केले. त्यात या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी केली; पण त्याकडे भारतीय प्रसारमाध्यमांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.