यावर्षीही ‘पीओपी’च्या श्री गणेशमूर्तींना अनुमती हवीच ! – अधिवक्ता आशिष शेलार, भाजप अध्यक्ष तथा आमदार

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती

मुंबई – कोट्यवधींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यांचा उद्योग बंद करून मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका. यावर्षीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’च्या) श्री गणेशमूर्तींना अनुमती मिळायलाच हवी. मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी मांडली. लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघाच्या वतीने १८ जून या दिवशी परेल येथे महाराष्ट्रातील मूर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. आशिष शेलार म्हणाले की, ‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो जनहित, महाराष्ट्र आणि देश हिताचा नाही. मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढले आहे की, ४ फुटांच्या खालील श्री गणेशमूर्ती या शाडू मातीच्याच असाव्यात, हे आम्हाला मान्य नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः महापालिका आयुक्त, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. जी मुंबई महापालिका गेली २५ वर्षे मुंबई येथील ३ सहस्र ५०० दशलक्ष लिटर सांडपाणी प्रतिदिन समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडत आहे, त्या मुंबई महापालिकेला फक्त श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते, असे बोलण्याचा अधिकार आहे का ?