३ वर्षीय मुलीचे अपहरण करणार्या आरोपीला ३ घंट्यांत अटक !
नागपूर – इतवारी रेल्वे स्थानकातून ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरून ३ घंट्यांत अटक केली. सामकुमार धुर्वे (वय ३० वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा भिलाई छत्तीसगड येथील रहिवासी आहे.
राजू छत्रपाल हे ३ वर्षांच्या मुलीला घेऊन रेल्वे स्थानकावर आरक्षण करण्यासाठी आले होते. तेथे सामकुमार भ्रमणभाष दाखवून मुलीला खेळवत होता. हे पाहून मुलीला तिथेच सोडून राजू हे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला गुपचूप उचलून नेले. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्रपाल यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई करत आरोपीच्या तावडीतून मुलीला सोडवले. (पालकांनो, लहान मुलांना अनोळखी लोकांकडे सोपवून अनर्थ ओढावून घेऊ नका ! – संपादक)