कर्नाटक सरकारच्या हिंदुविरोधी निर्णयांच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.
रामनाथी – अलीकडे कर्नाटकमध्ये सत्तापालट झाला. काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. तत्पूर्वीच्या भाजप शासनाने राज्यात काही सुधारित कायदे आणले होते; मात्र त्या कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात ते सरकार अल्प पडले होते. काँग्रेसने राज्यात सत्तेवर येताच पाठ्यपुस्तकांतून वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवारगुरुजी यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच धर्मांतरविरोधी कायदा मागे घेण्याची घोषणा केली. या सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोरपणे कारवाई करण्याचीही घोषणा केली आहे. राज्यशासनाने हिंदु राष्ट्राविषयीच्या बैठकीला अनुमती नाकारली. राज्य सरकारच्या हिंदुविरोधी निर्णयांच्या विरोधात लढा देण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद सिद्ध आहे. कर्नाटकातील हिंदु धर्मप्रेमींच्या रक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे उद्गार हिंदु विधिज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी येथे बोलतांना काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) बोलत होते.
अधिवक्ता अमृतेश पुढे म्हणाले की, वकिली हा एक उदात्त आणि समाजाभिमुख पेशा आहे. सांप्रदायिक, सामाजिक इत्यादी विषयांवर अधिवक्ते चांगल्या सूचना करू शकतात. धार्मिक अधिकार संरक्षण कायदा, गोवंशहत्याविरोधी कायदा इत्यादी कायद्यांच्या रक्षणासाठी हिंदु विधीज्ञ परिषद सतत कार्यरत रहाणार आहे.