भारतीय दांपत्याकडे त्यांच्या सवादोन वर्षांच्या मुलीला सोपवण्यास जर्मनीतील न्यायालयाचा  नकार !

मुलीचे लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपामुळे मुलगी सरकारच्या नियंत्रणात !

बर्लिन (जर्मनी) – बर्लिन येथील न्यायालयाने भारतीय दांपत्याची २ वर्षे ३ मासांच्या मुलीला तिच्या पालकांकडे सुपुर्द करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने या मुलीचे संगोपन करण्याचे दायित्व ‘जर्मनी युथ वेलफेअर कार्यालया’वर सोपवले आहे. वर्ष २०२१ पासून ही मुलगी सरकारच्या नियंत्रणात आहे.

१. या प्रकरणात भारत सरकार मुलीच्या पालकांना साहाय्य करत आहे. २ जून या दिवशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले होते की, लहान मुलीला सरकारच्या नियंत्रणात ठेवणे, हे सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषा अधिकार यांचे उल्लंघन आहे.

२. भारतातील १९ राजकीय पक्ष आणि ५९ खासदार यांनी जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप एकरमॅन यांना पत्र लिहून मुलीला तिच्या पालकांकडे सुपुर्द करण्याची विनंती केली आहे.

काय आहे प्रकरण ?

सदर मुलीचे वडील ‘सॉफ्टवेयर इंजिनियर’ आहेत. ते त्यांची पत्नीसमवेत जर्मनीत रहातात. त्यांची मुलगी ७ मासांची होती, तेव्हा खेळतांना तिला दुखापत झाली. पालकांनी तिला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी ‘तिचे लैंगिक शोषण झाले आहे’, असे सांगितले. त्यामुळे जर्मनीच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी मुलीला कह्यात घेतले. तेव्हापासून तिचे पालक तिला स्वतःच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.