ईश्वराप्रती भाव असणारे आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याविषयी झालेला सूक्ष्मातील प्रयोग !
१८ जून २०२३ या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये ‘कर्नाटक येथील अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याकडे पाहून काय वाटते ?’ असा सूक्ष्मातील प्रयोग घेण्यात आला. या वेळी सभागृहातील बहुतांश हिंदुत्वनिष्ठांना अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्याकडे पाहून आनंद जाणवला. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना पिठाच्या यति माँ चेतनानंद सरस्वती यांनी ‘पी. कृष्णमूर्ती यांच्या तोंडावळ्यावर साधनेचे तेज आहे. ते धर्मनिष्ठ आहेत. ते निष्ठापूर्वक धर्मकार्य करतात’, असे त्यांच्याकडे पाहून जाणवत असल्याचे सांगितले. अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे.
या वेळी सनातनचे धर्मप्रचारक पू. रामानंद गौडा यांनी अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडली. ते म्हणाले, ‘‘अधिवक्ता कृष्णमूर्ती भगवंताच्या अनुसंधानात असतात. त्यांचा नामजप सतत चालू असतो. प्रवासाच्या वेळी ते वाहनात इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावतात. भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते. सध्या कर्नाटकमध्ये हिंदुत्वाच्या कार्यासाठी ते अधिवक्त्यांचे संघटन करत आहेत. व्यष्टी साधना आणि धर्मप्रसाराचे समष्टी कार्य करण्याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत.
काही मासांपूर्वी अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. ‘त्या वेळी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांचे रक्षण केले’, असा त्यांचा भाव आहे. हे एक धर्मवीर आहेत.’’