मरणासन्न पुरोगामित्व आणि कोल्हापुरी हिंदुत्व !
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर येथे माध्यम-घोषित कथित दंगलीची चर्चा आहे. यामध्ये पुरोगामित्वाचा फुटका ढोल बडवणारे आघाडीवर असले, तरी त्यांना तो बडवावा लागतो, यातूनच कोल्हापूरचे हिंदुत्वनिष्ठ स्वरूप स्पष्ट होत आहे. येथे पुरोगाम्यांना कळत नाही की, ‘कोल्हापूर पुरोगामी कि हिंदुत्ववादी ?’, हा प्रश्न केव्हाच कालबाह्य झाला आहे. आता ‘कोल्हापूर हिंदुत्ववादी रहाणार ? कि आतंकवाद्यांचे घर होणार ?’, हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. प्रसारमाध्यमांतून होणारी जनतेची दिशाभूल आणि हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी यांवर प्रकाश टाकणारा हा लेख श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. कोल्हापुरात घडले काय ? आणि पुरोगाम्यांचे रडगाणे काय ?
कोल्हापूर शहरामध्ये शिवराज्याभिषेकदिनी (६ जून २०२३ या दिवशी) धर्मांध तरुणाने ‘औरंगजेब तुमचा बाप’, असे ‘स्टेटस’ (इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर ठेवलेले चित्र किंवा लिखाण) ठेवले. त्याच्यावर कारवाई व्हावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाणे गाठले; मात्र समाधानकारक कारवाई झाली नाही. पोलिसांकडून वेळकाढूपणा झाला. त्यामुळे संतप्त हिंदूंनी ७ जूनला ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली. बंदचे आवाहन करणार्या हिंदूंवर गल्ल्यांमधून दगडफेक झाली. त्यानंतर हिंदू संतापले. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या दंगलीचे अरण्यरुदन पुरोगाम्यांकडून चालू झाले. ‘कोल्हापूरचे पुरोगामित्व पुसण्याचा प्रयत्न !’, ‘कोल्हापूरमध्ये शांतताभंग करण्याचा डाव’, असे मनमानी निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न काही तथाकथित पुरोगामी माध्यमांनी चालवला. या धडपडीवरून कोल्हापुरातील पुरोगामित्व मरणासन्न स्थितीत आहे, हेच स्पष्ट झाले. जर या पुरोगामी पत्रकार मंडळींना खर्या अर्थाने पुरोगामित्वाची चाड असेल, तर त्यांनी वस्तूनिष्ठ आढावा मांडण्याचे धाडस दाखवायला हवे.
२. हिंदूंचा उद्रेक कशामुळे झाला ?
कोल्हापुरातील ७ जूनचा बंद हा केवळ ‘औरंगजेबाच्या उदात्तीकरणा’विरुद्ध नव्हता. गेल्या ३-४ मासांत कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या काही घटनांविरुद्धचा तो उद्रेक होता.
अ. कसबा बावडा येथे शासकीय शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणणार्या हिंदु महिलांवर धर्मांधांनी आक्रमण केले. महिलांचे रक्त पडेपर्यंत त्यांना मारहाण केली.
आ. हेर्ले, तालुका हातकणंगले या गावात मुसलमानांची संख्या अधिक आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला फलक फाडला.
इ. बिहारमधून ६९ अल्पवयीन मुसलमान मुलांना शिक्षणासाठी कोल्हापुरात आणणारा ट्रक येथे संशयास्पदरित्या आढळला.
हे घडत असतांना अहिल्यानगरमध्ये (नगरमध्ये) औरंगजेबाचे फलक नाचवण्यात आले. रामनवमीला हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे झाली. या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी कोणती कारवाई केली ? जर योग्य कारवाई केली असती, तर औरंगजेबाचे ‘स्टेटस’ ठेवण्याचे धाडस कुणी केले असते का ? पोलीस कारवाई करत नसतांना हिंदूंनी धर्मांधांवर कारवाईच्या मागणीसाठी ६ जूनला आंदोलन केले, तर चूक ते काय ?
३. तेव्हा शांतताप्रेमी मुसलमान कुठे होते ?
७ जूननंतर काही मुसलमान विचारवंत (?) सर्वांना शांततेचे आवाहन करत आहेत. ‘दोषी, वाट चुकलेल्या मुसलमान मुलांना शिक्षा करा’, असे म्हणत आहेत; मात्र बावडा, हेर्ले या ठिकाणच्या घटना घडतांना हे विचारवंत कुठे होते ? तेव्हा त्यांनी या वाट चुकलेल्या धर्मांधांना योग्य वाट का दाखवली नाही ? एकाही चांगल्या मुसलमानाने समाजकंटक धर्मांधांना पकडून का दिले नाही ? हे विचारवंत तेव्हा हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पहात होते का ?
४. कोल्हापूर हे शाहू महाराजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचेसुद्धा !
नेहमी ‘कोल्हापूर हे शाहू महाराजांचे होते’, असे सांगितले जाते. शाहू महाराज कोल्हापूरचे राजे होते आणि आजही आहेत; मात्र कोल्हापूर ५ पातशाह्यांशी लढणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचेही आहे. कोल्हापूर हे औरंगजेबाला पाणी पाजणार्या महाराणी ताराबाईसाहेबांचेही आहे. कोल्हापुरात सध्या घडलेल्या घटना जर शाहू महाराजांच्या काळात घडल्या असत्या, तर महाराजांनी धर्मांध नराधमांना हत्तीच्या पायाखाली दिले असते. त्यामुळे केवळ शाहू महाराजांचे नाव घेऊन कोल्हापूरकरांची दिशाभूल करणे थांबले पाहिजे. ‘जशास तसे उत्तर देणे’, हे कोल्हापूरकरांचे वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यानुरूप कोल्हापूरचे हिंदू वागले, एवढेच शाहू महाराजांचे नाव घेणार्यांनी लक्षात घ्यावे.
५. भोंदू पुरोगामित्वाचा ढोल बडवणे सोडा !
आज जे पुरोगामित्वाचा फुटलेला ढोल बडवत आहेत, त्यांना सांगणे एकच आहे की, त्यांचे पुरोगामित्व ‘भोंदू’ आहे; कारण ‘हिंदु समाजाने सगळा स्वाभिमान बासनात गुंडाळून ठेवावा आणि धर्मांधांनी त्यांच्या डोक्यावर मिर्या वाटाव्यात’, असे सांगणारे तुमचे पुरोगामित्व आहे. पुरोगाम्यांना अद्याप कोल्हापूरचे हिंदुत्वनिष्ठ परिवर्तन पचनी पडलेले नाही. त्यासाठी त्यांनी डोळे आणि कान उघडे ठेवून कोल्हापूरविषयी पुढील परीक्षण करणे आवश्यक आहे.
अ. वर्ष २००५ मध्ये शंकराचार्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला, तेव्हा हिंदुत्वनिष्ठ कोल्हापूरकर त्यांच्यासाठी धावून आले होते.
आ. वर्ष २००८ आणि वर्ष २०२३ मध्ये झालेल्या यज्ञाला विरोध झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ कोल्हापूरकरांनी यज्ञाचे रक्षण केले.
इ. महालक्ष्मी मंदिरातील धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी कोल्हापूरच्या रणरागिणींनी बाहेरून येणार्या पुरोगामी महिलांना धडा शिकवला.
ई. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’त सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणारे कोल्हापूरकर कोण होते ?
जेव्हा जेव्हा हिंदुत्वाच्या विरोधात काही झाले, तेव्हा तेव्हा कोल्हापूरच्या हिंदूंनी तत्परता दाखवली. हे कोल्हापूरच्या हिंदुत्वाचेच लक्षण !
६. पुरोगामी म्हणजे ‘निरो’चेच वंशज !
कोल्हापुरात धर्मांध हात-पाय पसरून वेगवेगळे डाव रचत असतांना ‘शांततेचा ढोल’ बडवणारे पुरोगामी, म्हणजे रोम जळत असतांना फिडल वाजवणार्या ‘निरो’चेच वंशज म्हणावे लागतील !
७. धर्मांधांच्या लेखी पुरोगामीही ‘काफीर’च !
काही दिवसांपूर्वी बिहारमधील ६९ मुसलमान लहान मुले इकडे का आणली ? त्यांना कोल्हापुरात कसले शिक्षण दिले जाणार होते ? काही वर्षांपूर्वी कोल्हापूरचा रहिवासी असलेला आतंकवादी इरफान आत्तार हा काश्मीरमधील पुलवामा येथे मारला गेला होता. तेव्हा कोल्हापूरचा तरुण तिकडे काय करायला गेला होता ? हे कुणालाच ठाऊक नव्हते. आता अन्य राज्यांतून मुले आणून कोल्हापुरात पेरणी केली जात आहे. कोल्हापूरच्या आसपासची गावे मुसलमानबहुल होत आहेत. हे असेच चालू राहिले, तर हीच धर्मांध मुले मोठी झाल्यानंतर पुरोगाम्यांना ‘पुरोगामी’ समजून सोडून देणार आहेत का ? आतंकवाद्यांचे ‘धर्मांधांच्या लेखी पुरोगामीही ‘काफीर’च असतात,’ हे सत्य पुरोगामी का नाकारत आहेत ?
७. हिंदु तरुण अधिक सतर्क !
काही जण लिहितात, ‘धर्माच्या नावावरून हिंदु तरुणांना भुरळ घातली जात आहे. ते त्या खोट्या हिंदु धर्मप्रसाराला फसत आहेत.’ एकप्रकारे ‘आजचे तरुण विचार करत नाहीत आणि कुणीही भरकटवले की, ते भरकटतात’, असे लिहिणार्यांचे म्हणणे आहे; पण वस्तूस्थिती निराळी आहे. आजचा हिंदु तरुण सतर्क आहे. सामाजिक माध्यमांमुळे तो सजग झाला आहे, तो विचार करतो, त्याला योग्य-अयोग्य कळते. त्याला पळपुटेपणा मान्य नाही. ‘कुणाला कसे उत्तर द्यावे’, याचे त्याला भान आहे. ६ आणि ७ जूनला रस्त्यावर उतरलेला तरुण रिकामटेकडा नव्हता. ‘स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्याला धर्मासाठी काहीतरी योगदान द्यावे’, असे वाटले; म्हणून बहुतांश तरुण रस्त्यावर उतरले होते.
८. पुरोगामी चळवळीला शेवटची घरघर !
ज्या पुरोगामी चळवळीला चालवण्याची भाषा माध्यम-पुरोगामी करत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावे की, पुरोगामी पुढार्यांची पुढची पिढी आता हिंदुत्वाचा वारसा चालवत आहे. कोल्हापुरातील पुरोगामी चळवळ वर्ष २००० पासून मोडकळीस आली होती. त्यामुळे या माध्यम-पुरोगाम्यांनी ८०-९० च्या दशकात रेंगाळणे सोडून द्यावे. कोल्हापुरातील पुरोगामी चळवळ आता नेतृत्वहीन आहे. पुढे तिला नेतृत्व मिळेल का ? हा प्रश्नच आहे.
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)