वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्म आणि मंदिरे यांचे रक्षण’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !
श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ ! – किशोर गंगणे, महाराष्ट्र मंदिर महासंघ, धाराशीव
रामनाथी, १७ जून (वार्ता.) – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. भगवंताच्या कृपेमुळे मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढा देत आहे. आम्ही श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असे परखड प्रतिपादन धाराशीव येथील ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे किशोर गंगणे यांनी केले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी (१७.६.२०२३ या दिवशी) बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर मुंबई येथील ‘केरलीय क्षेत्र परिपालन समिती’चे आचार्य कोण्णियूर पी. पी. एम्. नायर, सिंदखेड (धुळे) येथील आशापुरी माता मंदिराचे अध्यक्ष श्री. विजय पवार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रमोगेर हे उपस्थित होते.
राज्यघटनेमध्ये पालट करून हिंदु राष्ट्राची निर्मिती करावी लागेल ! – कोण्णियूर पी. पी. एम्. नायर, आचार्य, केरलीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई
प्रत्येक व्यक्ती जेव्हा प्रभु श्रीरामाप्रमाणे वागेल, त्या वेळी रामराज्य येईल. रामराज्य येण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या वेळी नेते आपल्याकडे हात पसरून मते मागतात; मात्र आपला मुख्य शासक भगवंत आहे. त्या मुख्य शासकाशी अनुसंधान ठेवायला हवे. राज्यघटनेत पालट करूनच आपल्याला हिंदु राष्ट्राची निर्मिती करायची आहे. भारतात समान नागरी कायदा, तसेच धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा आणायला हवा. कृषी आणि ऋषि यांचे रक्षण करायला हवे.
भाविकांनी केलेल्या अर्पणाचा योग्य विनियोग व्हावा ! – विजय पवार, अध्यक्ष, आशापुरी माता मंदिर, सिंदखेड, धुळे, महाराष्ट्र
गावागावांमध्ये अनेक छोटी-छोटी मंदिरे आहेत. या मंदिरांना तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील मंदिरांशी जोडायला हवे. भाविकांनी मंदिरांमध्ये केलेले अर्पण लाख मोलाचे आहे. त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा.
कानिफनाथ मंदिर वाचवण्यासाठी कायदेशीर प्रयत्न चालू राहील ! – श्रीहरि आंबेकर, कान्होबा उपाख्य कानिफनाथ देवस्थान, गुहा, महाराष्ट्र
कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. त्यानंतर वर्ष २००५ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी कोणालाही काहीही कळू न देता या भूमीवर वक्फ बोर्डाने ताबा मिळवला. त्यानंतर एक ट्रस्ट बनवून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्या भूमीच्या कागदपत्रांवरील कानिफनाथ देवस्थानचे नाव हटवून हजरत रमजान शहा दर्गा नोंद केली. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ग्रामसभा घेतली. त्यात तलाठ्याकडील नोंद रहित करावी, असा ठराव करण्यात आला. आमच्या १९ लोकांवर वक्फमध्ये खटला प्रविष्ट करण्यात आला. आता आमचा कानिफनाथ मंदिर वाचवण्याचा कायदेशीर लढा चालू आहे आणि तो चालूच राहील.