बालभारतीच्या पुस्तकातून क्यू.आर्.(QR) कोड वगळला !
|
सोलापूर – राज्यातील शाळा १५ जूनपासून चालू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनाद्वारे पुस्तके देण्यात आली आहेत; पण या पुस्तकांत क्यू.आर्. कोड (QR) नाहीत. ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या संकल्पनेतून शिक्षण अधिक रंजक करण्याच्या हेतूने पुस्तकांमध्ये क्यू.आर्. कोडचा (QR) समावेश करण्यात आला होता. या कोडमुळे विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ ऑडिओ आणि व्हिडिओ रूपात अभ्यासक्रम शिकता येत होते; मात्र हेच क्यू.आर्. कोड पुस्तकातून काढल्याने शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी ट्वीटद्वारे अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
बालभारती पुस्तकातून QR कोड वगळला, डिसले गुरुजींच्या चेहऱ्यावर नाराजीचे ‘स्कॅनिंग’https://t.co/5zAbR2vj1V #DisaleGuruji #Balbharati #QRCode pic.twitter.com/zP9eBfD4iZ
— Maharashtra Times (@mataonline) June 16, 2023
‘वर्ष २०१६ मध्ये मी स्वतः बालभारतीला एक प्रस्ताव देऊन पुस्तकांत क्यू.आर्. कोड समाविष्ट करण्याविषयी सुचवले होते. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पुस्तकांत हे कोड छापले होते. प्रत्येक धड्यासाठी ‘डिजिटल कंटेंट’ बनवून ते ‘क्यू.आर्.’च्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचत होते’, असे ट्वीट रणजितसिंह डिसले यांनी केले आहे. डिसलेगुरुजी म्हणाले की, राज्यशासनाने काढून टाकलेले क्यू.आर्. कोड हे पुस्तकात पुन्हा छापण्यात यावेत, अशी मागणी डिसले यांनी केली आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत ज्या वेळी शाळा बंद होत्या, त्या वेळी मुलांचे शिक्षण केवळ क्यू.आर्. असलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे चालू राहिले होते. यासाठी सरकारने एक धोरण निश्चित करावे. एकदा क्यू.आर्. कोड छापल्यानंतर ते परत पुस्तकातून काढले जाणार नाहीत, याची निश्चिती करावी लागेल.