राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट !
पोवई नाका परिसरातील स्मारकाचे प्रकरण
सातारा, १७ जून (वार्ता.) – शहरातील पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही स्मारक असू नये. या परिसरात दुसरे कोणतेही स्मारक निर्माण झाल्यास शिवभक्तांचा जनक्षोभ उसळेल, अशा भावना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समक्ष भेटून व्यक्त केल्या. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी जाऊन राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.
या वेळी राजमाता यांनी ऐतिहासिक पोवई नाक्याचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले. पोवई नाका येथील शिवस्मारक परिसराला अलीकडेच शिवप्रेमींनी ‘शिवतीर्थ’ हे नाव दिले आहे. याच परिसरात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा, तसेच चौक सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्व सातारावासियांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त या परिसरात कुणाचे स्मारक होऊ देणार नाही. असे झाल्यास सर्व शिवभक्तांचा जनक्षोभ उसळेल. शिवप्रेमी आणि सामाजिक संघटना याविषयी आक्रमक झाले असल्याची माहिती राजमाता यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
लोकभावनेचा आदर केला पाहिजे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसातारा नगरीला ऐतिहासिक वारसा आहे. शिवप्रेमींची भावना आणि लोकभावना विचारात घेऊन पोवई नाक्यावरील नव्याने होऊ घातलेल्या स्मारकाचा निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात आपण स्वतः सर्व संबंधितांशी बोलू. शेवटी लोकभावनेचा आपण आदर केला पाहिजे, असे या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. |