अल्पवयीन मुलाने चारचाकी चालवतांना झालेल्या अपघातात २ जण ठार !
मुंबई – १४ जूनला पहाटे अल्पवयीन मुलाने गंमत म्हणून वडिलांनी सेडन गाडी चालवायला घेतली. हा मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉईंटच्या दिशेने निघाला. गिरगाव चौपाटीजवळ नजीक कॅफे आयडियलजवळ दुचाकीला जोरात धडकल्याने अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्वर खान (३६) हे ठार झाले आहेत. अकबर खान हे लांब फेकले गेले, तिथे जागीच त्यांचा मृत्यू झाला, तर किरण खान यांचा रुग्णालयात उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.
मुलासमवेत त्याचा मित्रही असल्याचे सांगितले जात आहे. घरून निघतांना त्याने सायकल घेऊन जातो, असे सांगितले होते. चारचाकी घेऊन गेल्याची घरच्यांना कल्पना नव्हती. गाडी बरेच दिवसांत न चालवल्याने ब्रेक लवकर लागत नव्हते, त्यामुळे मुलाला ब्रेक लवकर लावता आले नाहीत, असे समजते. अल्पवयीन मुलावर ‘रॅश ड्रायव्हिंग’ आणि ‘बेजबाबदार ड्रायव्हिंग’चा गुन्हा नोंद झाला आहे. त्याच्या वडिलांवरही परवाना नसतांना मुलाला कार चालवू दिल्याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.