सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवात रथोत्‍सव चालू असतांना सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेला रथ आकाशात असून तो भव्‍य-दिव्‍य, सोनेरी आणि प्रकाशमान दिसणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाचा कार्यक्रम चालू असतांना रथात बसलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंंगबाळ यांना काही सांगत होते. तेव्‍हा मला तो रथ आकाशात असून सोनेरी, प्रकाशमान आणि भव्‍य-दिव्‍य दिसत होता.

२. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीकृष्‍णाच्‍या रूपात साधकांना गीतोपदेश करून त्‍यांच्‍या साधनेतील अडथळे, मायेचे विचार नष्‍ट करत आहेत’, असे दिसणे

त्‍या भव्‍य सोनेरी रथात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् भगवान श्रीकृष्‍णाच्‍या रूपात दिसून ते तिथे उपस्‍थित असलेल्‍या अगणित साधकजिवांना गीता सांगत आहेत’, असे मला जाणवले. जणू एकाच वेळी दोन गोष्‍टी घडत होत्‍या. ‘एकीकडे स्‍थुलातून चैतन्‍यमय रथात बसून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना काही सांगत आहेत आणि त्‍याच वेळी सूक्ष्मातून निळ्‍या कांतीच्‍या श्रीकृष्‍णरूपात असंख्‍य साधकजिवांना गीताज्ञान सांगून त्‍यांच्‍यात परिवर्तन करत आहेत, तसेच त्‍यांच्‍या मनातील मायेचे विचार अन् साधनेतील अडथळे नष्‍ट करत आहेत. त्‍यामुळे सगळ्‍या साधकजिवांमध्‍ये पालट होत आहे. ‘सर्वांना हिंदु राष्‍ट्रात जायचे आहे’, याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूचना देत आहेत’, असे दृश्‍य मला दिसत होते.

३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीविष्‍णुरूपात आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ श्री महालक्ष्मीदेवीच्‍या रूपात दिसणे

पू. (सौ.) संगीता जाधव

रथोत्‍सवाच्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ विराजमान असलेला रथ पटांगणात परिक्रमा करत असतांनाचे सुंदर दृश्‍य बघतांना काही क्षण मला ते तिघेही देवतारूपात व्‍यासपिठावर दिसले. तेव्‍हा मला रथ रिकामा दिसला. व्‍यासपिठावर ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या दोघी श्री लक्ष्मीदेवीच्‍या रूपात उभ्‍या असून त्‍या दोघींच्‍या मध्‍यभागी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीविष्‍णुरूपात उभे आहेत. त्‍यांच्‍याकडून सर्वत्र मोठ्या प्रमाणात चैतन्‍याचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.

४. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या हातांच्‍या हालचाली होतांना त्‍यांच्‍या हातातून सूक्ष्मातून बाण, त्रिशूळ अशी वेगवेगळी शस्‍त्रे सुटत आहेत’, असे दृश्‍य मला दिसत होते.

५. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या दोघींवर प्रक्षेपित होणारा पिवळ्‍या रंगाचा दिव्‍य प्रकाश मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे दिसणे

कार्यक्रम चालू असतांना मध्‍येेमध्‍ये मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मस्‍तकावर पांढर्‍या रंगाचा दिव्‍य प्रकाश मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसला, तर ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींवर प्रक्षेपित होणारा पिवळ्‍या रंगाचा दिव्‍य प्रकाश पुष्‍कळ प्रमाणात सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.

६. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना दिलेल्‍या उत्तराधिकार पत्रातून त्‍या दोघींना आवश्‍यक त्‍या सर्वांपर्यंत पोचवल्‍याचे जाणवून पुष्‍कळ कृतज्ञता वाटणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना दिलेल्‍या उत्तराधिकार ताम्रपत्रात त्‍यांच्‍या हस्‍ताक्षरांतील अक्षरे कोरली आहेत. ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग ते ‘उत्तराधिकारपत्र’ वाचत असतांना मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अक्षरांतून पूर्ण वायूमंडलात विविध रंगांची कारंजी उडतांना दिसली. मला ‘त्‍या कारंजांतील अगणित तुषारांत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या दोघी चांदण्‍यांप्रमाणे दिसत आहेत अन् ते तुषार सर्वत्र वायूवेगाने पसरत आहेत’, असे सुंदर आणि अद़्‍भुत दृश्‍य दिसले. ते दृश्‍य पाहून ‘श्री गुरूंनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्‍यांना सर्वांपर्यंत पोचवले आहेे. श्री गुरूंना ज्‍या घरांमध्‍ये त्‍यांचा निरोप पोचवायचा आहे; ते हिंदुत्‍वनिष्‍ठ, धर्मप्रेमी, साधक, भक्‍त आणि भाविक यांच्‍यापर्यंत तो निरोप पोचला असून ज्‍यांना शक्‍ती प्रदान करायची आहे, त्‍यांच्‍यापर्यंत श्री गुरूंनी त्‍या दोघींना पोचवले आहे’, असे जाणवून मला श्री गुरूंप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.’

– पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत), ठाणे सेवाकेंद्र (११.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक