पाण्याच्या पुनर्प्रक्रियेतून नवी मुंबई महापालिकेला ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार ! – गणेश नाईक, आमदार
नवी मुंबई, १६ जून (वार्ता.) – पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी प्रकल्पातील पाण्याच्या विक्रीतून महापालिकेला ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर भाजपच्या वतीने महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत ऐरोली विधानसभा मतदार क्षेत्रातील उल्लेखनीय ४ विकास प्रकल्पांना भेट दिल्यानंतर गणेश नाईक पत्रकारांशी बोलत होते.
नाईक पुढे म्हणाले की, सांडपाण्यावर पुणर्प्रक्रिया करण्याचे २० दशलक्ष लिटर क्षमतेचे प्रकल्प ऐरोली आणि कोपरखैरणे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमधून शुद्ध होणारे पाणी विकून पुढील १५ वर्षार्ंत नवी मुंबई महापालिकेला ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
या वेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार,भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिकांच्या मागणीनुसार नाईक यांनी दिघा स्थानक निर्मितीची मागणी केली होती. ९० कोटी रुपये खर्च करून हे स्थानक बांधण्यात आले आहे. या स्थानकाला ‘दिघा गाव स्थानक’ असे नाव देण्याची स्थानिकांच्या मागणीविषयी रेल्वेमंत्र्यासह चर्चा करून कार्यवाही चालू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी जैवविविधता केंद्र (बायोडायव्हर्सिटी सेंटर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांची पहाणी करण्यात आली. या प्रसंगी दिवा जेट्टीचा केंद्र सरकारच्या ‘सागरमाला योजने’अंतर्गत विकास केला जाणार असल्याची नाईक यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या मागील ९ वर्षांच्या कार्यकाळात देशभरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण विकासप्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वर्ष २०२४ मध्येही जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करेल, असेही नाईक यांनी या वेळी सांगितले.