पुणे येथे तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे गाडीत राहिलेला मुलगा आई-वडिलांना सापडला !
एम्.व्ही. सोन्ना यांची अभिनंदनीय कृती
पुणे – एक लहान मुलगा आई-वडिलांसह ११ जूनला ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ने प्रवास करत होता; मात्र गाडी पुण्याला येताच त्याचे आई-वडील फलाटावर उतरले. आई-वडिलांकडे सामान्य तिकीट होते. पण तरीही हे सर्वजण ‘स्लीपर कोच’मध्ये बसले होते. पुणे स्थानकावर गाडी आली तेव्हा तिकीट तपासनीसाच्या (टी.सी.) भीतीपोटी सर्व कुटुंबीय फलाटावरवर उतरले; मात्र त्यांचा मुलगा मात्र स्लीपर कोचच्या डब्यातच राहिला. खाली उतरल्यावर त्यांना आपल्यासह मुलगा नाही हे लक्षात आले. त्यांना चूक लक्षात येताच मुलाच्या आई-वडिलांनी स्थानकावर असणारे तिकीट तपासनीस तिवारी यांच्याकडे धाव घेतली. तिवारी यांनी त्या वेळी त्या गाडीमध्ये कामावर असणार्या श्री. एम्.व्ही. सोन्ना यांना संपर्क साधला. त्यांनी त्या मुलाला शोधून काढले. सोन्ना हे तिकीट तपासनीस असून ते नियमित रात्रीच्या ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित असतात. त्यांच्या साहाय्याने गाडीत राहिलेल्या मुलाला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तिवारी आणि सोन्ना यांच्या प्रसंगावधानतेमुळे गाडीत राहिलेला मुलगा आई-वडिलांना सापडला आहे. त्यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.