आधारकार्ड नसणार्‍यांना उपचार नाकारल्‍यास कारवाई !

मुंबई महानगरपालिकेची आरोग्‍य अधिकार्‍यांना चेतावणी

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – आधारकार्ड नसणार्‍यांना उपचार नाकारल्‍यास कारवाई केली जाणार असल्‍याची चेतावणी मुंबई महानगरपालिकेने आरोग्‍य अधिकार्‍यांना दिली आहे. तसेच आधारकार्ड नसले, तरी कोणत्‍याही गर्भवतीला आरोग्‍य सुविधा देण्‍याचे आदेशही दिले आहेत.

नुकतेच राजावाडी रुग्‍णालयात नवर्‍याचे आधारकार्ड नसल्‍याने गर्भवतीला उपचार नाकारल्‍याची घटना घडली होती. या घटनेनंतर अनेक सामाजिक आणि रुग्‍णमित्र संस्‍थांनी याची तक्रार करून विरोध केला होता. या घटनेची नोंद घेत आरोग्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी परिपत्रक काढून आधारकार्ड नसलेल्‍या कोणत्‍याही गर्भवतीला सुविधा देण्‍याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्‍यास कारवाई करण्‍यात येईल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

संपादकीय भूमिका :

  • आता बांगलादेशी घुसखोरांना विनामूल्‍य उपचारांसाठी महापालिकेने जणू परवानाच दिला आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
  • उपचारांसाठी आधारकार्ड मागण्‍याची आवश्‍यकता का भासली ? हे लक्षात घेतले पाहिजे. अशा काही प्रसंगावरून घेतलेल्‍या निर्णयांमुळे पूर्वीच्‍या निर्णयांचा उद्देश सफल होत नाही  !