अमेरिकेत हिंदुत्‍वाचा डंका !

जागतिक महासत्ता असलेल्‍या अमेरिकेच्‍या संसदेत वैदिक मंत्रोच्‍चारात पहिली हिंदु-अमेरिकी परिषद पार पडली. या परिषदेत १३० भारतीय अमेरिकी नेते सहभागी झाले होते. अमेरिकेतील २० हिंदु संघटनांच्‍या सहकार्याने ही परिषद पार पडली. अमेरिकेतील हिंदूंच्‍या समस्‍यांकडे तेथील कायदा निर्मात्‍यांचे लक्ष वेधून घेणे, हा या परिषदेचा उद्देश होता. या परिषदेच्‍या आयोजकांचे म्‍हणणे आहे की, अमेरिकेच्‍या प्रगतीत तेथील हिंदूंचे योगदान आहे, प्रत्‍येक क्षेत्रात त्‍यांची चांगली कामगिरी असूनही त्‍यांच्‍याशी भेदभाव केला जातो. तेथे हिंदू राजकीयदृष्‍ट्या मागासलेले आहेत, अशी हिंदूंची भावना आहे. ‘सर्व जग आर्य म्‍हणजे सुसंस्‍कृत करू’, अशी हिंदूंना वेदांची आज्ञा आहे. अशी मनोभूमिका असलेले हिंदू भारतातून ज्‍या ज्‍या देशांमध्‍ये काही ना काही कारणांमुळे गेले, स्‍थलांतरित झाले, तेथे त्‍यांनी तेथील देशांतील सर्व परिस्‍थितीशी जुळवून घेण्‍याचा, तेथे सामावून जाऊन स्‍वत:चे चांगल्‍यात चांगले योगदान देण्‍याचा प्रयत्न केला आहे. स्‍वत:च्‍या सहिष्‍णु आणि सोशिक वृत्तीने लोकांना जोडले आहे, त्‍या त्‍या देशवासियांची मने जिंकली आहेत.

असे असतांनाही हिंदूंच्‍या या सहिष्‍णूतेचा अपलाभच इतरांनी घेतला आहे. हिंदूंवर टीका करण्‍यात येते, हिंदूंच्‍या मंदिरांवर आणि हिंदूंवर आक्रमणे करण्‍यात येतात, महत्त्वाच्‍या पदांवर बसण्‍यासाठी काही तडजोडी करण्‍यास सांगण्‍यात येते, अशी एक ना अनेक उदाहरणे आहे. परदेशस्‍थ हिंदूंनी त्‍यांची कर्तव्‍ये निभावतांना कधी त्‍यांचा धर्म आड आणला नाही; मात्र त्‍यांना इतरांकडून ‘हिंदु’ म्‍हणूनच लक्ष्य केले जाते, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. असे प्रकार होत असतांना हिंदूंनी ‘हिंदु’ म्‍हणून एकत्र येत पुष्‍कळ मोठा विरोध केला, असेही प्रत्‍येक वेळी होतेच असे नाही. त्‍यांच्‍यावरील घटनांचा निषेध मात्र केला आहे. हिंदु म्‍हणून काही वेळा अमेरिकेत हिंदूंच्‍या हत्‍या करण्‍यात आल्‍या, तेव्‍हा हिंदूंनी कधीही शस्‍त्र उचलून प्रतिशोध घेतला, असे झालेले नाही; पण यामुळेच कि काय हिंदूंंना न्‍यून लेखण्‍यात येते. अशा वेळी शक्‍तीप्रदर्शन करणे आवश्‍यक ठरते. तेच या परिषदेच्‍या निमित्ताने हिंदूंच्‍या लोकप्रतिनिधींनी केले आहे. याची नोंद अमेरिकेच्‍या खासदारांनी न घेतल्‍यास नवल ! अमेरिकेतील खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक यांनी हिंदु लोकप्रतिनिधींवर ‘अमेरिकेचा राष्‍ट्रपती निवडण्‍याची क्षमता अमेरिकेतील हिंदूंकडे आहे’, अशी स्‍तुतीसुमने उधळली. यातून मॅककॉर्मिक यांनाही हिंदूंमध्‍ये उपजतच असलेल्‍या निर्माण क्षमतेची जाण आहे, हे लक्षात येते. १ शतकापूर्वी अमेरिकेतच स्‍वामी विवेकानंदांनी हिंदु धर्मातील चैतन्‍याचा वर्षाव करून तेथील जनतेला आपलेसे केले. या हिंदुत्‍वाच्‍या सामर्थ्‍याची कल्‍पना अमेरिकेत अनेकांना आहेच. हिंदु हितकारक म्‍हणजेच मानव आणि सृष्‍टीचे कल्‍याण करणारी व्‍यवस्‍था निर्माण करण्‍याची संधी तेथील हिंदूंना मिळाली आहे, ती त्‍यांनी साध्‍य करून महासत्तेचे हिंदुकरण करावे, हीच भारतियांची इच्‍छा !

जागतिक पातळीवर हिंदूंना मिळत असलेले समर्थन आणि त्‍यांचे संघटन ही हिंदुत्‍वाच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याची निश्‍चिती !