वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रथम दिनी ‘राज्यघटना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा बौद्धिक लढा जिंकण्यासाठी हिंदूंविरोधातील ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) समजून घेणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी, १६ जून (वार्ता.) – केंद्रात हिंदुत्वनिष्ठ पक्षाची सत्ता आल्यापासून देशभरात अचानक सर्व माध्यमांतून असहिष्णुता वाढत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू झाली. ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार चालू होतात’, ‘मुसलमानांच्या समूहहत्या केल्या जातात’, ‘सरकार पक्षपाती भूमिका घेऊन मुसलमानांच्या विरोधात कायदे बनवते’, ‘दंगली घडवून अल्पसंख्यांकांना मारले जाते’, तसेच ‘भारतात अल्पसंख्यांकांचे अस्तित्व संकटात आहे’, अशी विविध प्रकारची कथानके रचून त्यांचा जगभरात प्रचार केला गेला; मात्र त्या सर्व कथानकांमागे एक बीज, संकल्पना आणि धोरण (अजेंडा) होते. या माध्यमातून जागतिक स्तरावर हिंदूंना असहिष्णु, तसेच आक्रमक ठरवले जाते. यामध्ये ‘भारतीय मुसलमानांना पीडित असल्याचे दाखवणे’, हा उद्देश आहे. यातून मुसलमानांच्या जिहादी मानसिकतेला बळ देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काल्पनिक कथानक (नॅरेटिव्ह) समजून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत हे समजून घेत नाही, तोपर्यंत हिंदु राष्ट्राच्या आड येणार्या समस्या आपण समूळ नष्ट करू शकणार नाही, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘राज्यघटना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ‘हिंदु राष्ट्र विरोधकांच्या काल्पनिक कथानकांचा प्रचार’ या विषयावर बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर देहली येथील डॉ. विवेकशील अगरवाल, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, उत्तरप्रदेश येथील अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्याय मित्र अधिवक्ता अरुण गुप्ता, झारखंड ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकत्रितपणे ‘हिंदु हेल्पलाईन’ आवश्यक ! – डॉ. विवेक शील अगरवाल, देहली
या देशात हिंदु जनजागृती समिती निर्माण होईल, अशी ४० वर्षांपूर्वी कल्पनाही करू शकत नव्हतो; पण आज वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या यांवर ‘हिंदु’ या शब्दावर चर्चा होत आहेत. त्यामुळे त्यांचा ‘टी.आर्.पी.’ (लोकप्रियता) वाढत असतो. केवळ हिंदीच नाही, तर इंग्रजी वृत्तवाहिन्यांवरही हिंदूंविषयी चर्चा होत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ यांसारखे हिंदूंवरील आघातांविषयी जागृती करणारे चित्रपट कोट्यवधींचा व्यवसाय करत आहेत. बागेश्वर धामचे महाराज उघडपणे हिंदु राष्ट्राचा जयघोष करत आहेत. त्यामुळे सध्या हिंदूंसाठी सुवर्णकाळ वाटत असला, तरी आपल्या शत्रूची सिद्धताही आपल्याहून अनेक पटीने अधिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आज हिंदूंवर सर्व बाजूंनी बाजूने आघात होत आहेत.
भारतात अनेक ठिकाणी हिंदूंनाच घरदार सोडून पलायन करावे लागत आहे. आजही भारतात फाळणीच्या वेळेप्रमाणे परिस्थिती आहे. हिंदु मुले-मुली धर्मापासून दूर जात आहेत. त्याचा लाभ धर्मांध घेत आहेत. त्यामुळे धर्मांधांकडून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे. ठिकठिकाणी हिंदूंना मार खावा लागत आहे. त्यामुळे हिंदूंसाठी हा ‘अमृतकाळ’ नाही, तर ‘विषकाळ’ आहे. धर्मांधांची वर्ष २०४७ ची सिद्धता चालू आहे. पूर्वी धर्मांधांच्या भागातील गुप्त सूचना पोलिसांना मिळत होत्या; पण आता त्या मिळणे अशक्य झाले आहे. ते त्यांच्या योजनांवर विचारपूर्वक काम करत असतांना हिंदूंनाही त्यांचे बळ वाढवणे आवश्यक आहे. सध्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर धर्माचे कार्य करत आहेत. त्यामुळे त्या सर्वांना एका व्यासपिठावर संघटित करून त्यांच्या माध्यमातून सर्व शहरांमध्ये ‘हिंदु हेल्पलाईन’ सिद्ध करणे आवश्यक आहे. सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्य केले, तर येत्या ३०-४० वर्षांमध्ये हिंदूंचे रक्षण होऊ शकेल.
राज्यघटनेद्वारे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
मागील ७५ वर्षांत हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. केवळ संत, महात्मे यांच्या कृपेने भारतात अद्यापही धर्म टिकून आहे. ‘सेक्युरिझम’ (धर्मनिरपेक्षता) या शब्दामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. धर्मनिरपेक्ष व्यवस्था म्हणजे अधर्मी व्यवस्था आहे. वर्ष १९१९ मध्ये ‘प्लेसेस ऑफ वर्शीप ॲक्ट’द्वारे (‘धार्मिक स्थळे कायदा १९९१’द्वारे) अयोध्येतील श्रीराम मंदिर वगळून सर्व मंदिरे वर्ष १९४७ मध्ये ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीत ठेवण्याला मान्यता देण्यात आली. यामुळे काशी येथील विश्वनाथ मंदिरासह सहस्रावधी मंदिरे मुक्त करण्यात बाधा निर्माण झाली आहे.
त्यामुळे भारताला पुन्हा हिंदु राष्ट्र करण्यासाठी आंदोलन, संसद आणि न्यायव्यवस्था या लोकशाहीने दिलेल्या मार्गांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण घेतले असूनही जोपर्यंत प्रमाणपत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत ‘डॉक्टर’ म्हणून मान्यता प्राप्त होत नाही. त्याप्रमाणेच हिंदुबहुल व्यवस्था असली, तरी राज्यघटनेद्वारे भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक आहे.
गंगाजलामध्ये संपूर्ण भारताला रोगमुक्त करण्याची क्षमता असल्याने त्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक ! – अधिवक्ता अरुण गुप्ता, न्याय मित्र, अलाहाबाद उच्च न्यायालय, उत्तरप्रदेश
ऋषिमुनी आणि वैज्ञानिक यांनी गंगानदीचे मोठे वर्णन केले आहे. गंगा नदीमध्ये प्राणवायूची पातळी सर्वाधिक आहे. गंगाजलामध्ये ‘बॅक्टेरिया फॉस’ नावाचा विषाणू असतो. त्यामुळे गंगाजल खराब होत नाही. गंगाजल पिण्याने आरोग्य नेहमी चांगले रहाते. कोरोना महामारीच्या काळात गंगा नदीच्या किनार्यावरील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य शहरांहून अल्प आढळले असून बरे होणार्यांची संख्याही अधिक आढळून आली आहे. केवळ कोरोनाच नाही, तर कर्करोगासारखे अन्य आजारही गंगेच्या पाण्याने बरे होऊ शकतात. गंगानदीमध्ये संपूर्ण भारताला रोगमुक्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अशा गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. यासमवेतच गंगा नदीमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे, हे सर्व भारतियांचे कर्तव्य आहे.
हिंदूंच्या हिताची ‘थिंक टॅक’ निर्माण करून गावागावांत पोचवायला हवी ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू, झारखंड
भारतात हिंदूंविरोधी काल्पनिक विचारधारा निर्माण केल्या जात आहेत. भारतात मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यास मुसलमानांना अटक करतांना परिस्थिती चिघळू नये, यासाठी हिंदूंनाही अटक केली जाते. खालिस्तानवादी, नक्षलवादी यांसह ‘बीबीसी’ सारख्या वृत्तसंस्था हिंदूंविरोधी कारवाया करत आहेत. हिंदूंमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक शक्ती नाही. त्यामुळे राज्याराज्यांमध्ये हिंदूंविरोधी कारवाया चालू आहेत. हे रोखण्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे. हिंदूंचा दबावगट होईल, तेव्हाच शासनकर्त्यांना त्यांची नोंद घ्यावी लागेल. मुसलमानांच्या मागे त्यांचे धर्मबांधव नेहमी उभे रहातात; मात्र धर्मासाठी कार्य करणार्या हिंदूंच्या मागे हिंदू उभे रहात नाहीत. यासाठी हिंदूंच्या हिताची विचारधारा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी गावागावांतील मंदिरांमध्ये साप्ताहिक बैठका होणे आवश्यक आहे. यांमध्ये हिंदूंच्या हिताचा विचार मांडायला हवा. हिंदूंचे विरोधक हिंदूंविरोधी विचारधारा पसरवत असतील, तर हिंदूंनी स्वत:च्या हिताची विचारधारा निर्माण करून गावागावांत पोचवायला हवी. याच्या समन्वयासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करणे आवश्यक आहे.