‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ काळातील ग्रहस्थिती आणि त्यामुळे होणारे लाभ !
‘या वर्षी अनेक शुभ ग्रहयोग आहेत. अधिवेशन काळात रवि मिथुन राशीत, चंद्र ग्रह अनुक्रमे वृषभ, मिथुन आणि कर्क राशींत, मंगळ कर्क राशीत, बुध वृषभ राशीत, गुरु ग्रह मेष राशीत, शुक्र कर्क राशीत, शनि कुंभ राशीत, राहू मेष राशीत अन् केतू तुळ राशीत, अशी ग्रहस्थिती आहे. हे अधिवेशन उत्तरायणात होणार आहे. उत्तरायण हे सर्व कार्यांसाठी शुभ मानले जाते.
१. १६.६.२०२३ या दिवशी, म्हणजे अधिवेशनाच्या आरंभदिनी ‘कृत्तिका’ हे नक्षत्र असून वृषभ रास आहे. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवि ग्रह आहे. रवि हा ग्रह आत्मिक तेजाचा कारक असून नेतृत्व गुण वाढवणे आणि संघटन करणे यासाठी लाभदायक आहे.
२. या दिवशी चंद्र-बुध युतीयोग आहे. चंद्र हा ग्रह मनाचा आणि बुध हा ग्रह बुद्धीचा कारक आहे. या अधिवेशनात राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य करण्याच्या उद्देशाने सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या मनातील विचारांना प्रत्यक्ष कृतीची व्यापक प्रमाणात जोड मिळेल.
३. या काळात शनि हा वायुतत्त्वाचा ग्रह कुंभ या वायुतत्त्वाच्या राशीत (स्वराशीत) आहे. शनि हा ग्रह चिंतनशील, न्यायी, द्रष्टा, प्रगल्भ बुद्धीचा कारक ग्रह आहे. शनि हा ग्रह कर्माचा प्रतिनिधी असल्यामुळे जीवनात युवावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत त्याचा प्रभाव दर्शवतो. शनिच्या प्रभावामुळे हे अधिवेशन सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या, तसेच समाजमनाच्या विचारांना चालना देणारे, अविचाराला प्रतिरोध करणारे आणि चिंतन वाढवणारे असेल. पूर्वीच्या अधिवेशनांपेक्षा या अधिवेशनाची फलनिष्पत्ती उत्तरोत्तर वाढतच जाईल. या अधिवेशनाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन सर्वांनाच प्रभावित करील. या अधिवेशनात कार्यासाठी आवश्यक असणार्या उत्तमोत्तम नवीन कल्पना सुचतील. हे हिंदू अधिवेशन अविस्मरणीय होईल !
११ व्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे अंकशास्त्रानुसार महत्त्व‘११’ या अंकाची एक अंकी बेरीज १ + १ = २ येते. ‘२’ हा अंक चंद्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. चंद्र हा ग्रह भक्ती, प्रेमभाव आणि मन यांचा कारक ग्रह आहे. भावभक्तीने आणि कृतज्ञताभावाने ईश्वराला शरण जाणार्याला ईश्वराची अनुभूती येईल. प्रेमभावामुळे देशातीलच नाही, तर विदेशांतील हिंदूंचाही सहभाग वाढेल आणि विदेशांतही हे कार्य वृद्धींगत होईल. विविध प्रसारमाध्यमांद्वारे कार्याचा व्यापक प्रसार होईल. अधिवेशनाच्या या समष्टी कार्याला अनेक संतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. या अधिवेशनात साधना म्हणून सहभागी होणार्या अनेकांची आध्यात्मिक प्रगती होईल.’ |
– सौ. प्राजक्ता जोशी, (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.६.२०२३)