हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची आवश्यकता !

श्रृंगेरी येथील दक्षिणाम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारती तीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांनी दिलेला शंकराचार्यांचा आशीर्वादरूपी शुभसंदेश !

जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आजपासून ७ दिवस गोमंतकमध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी ‘सनातन हिंदु धर्माचे आचरण आणि त्यांचे महत्त्व’ यांविषयी जागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. आपला सनातन धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्यात प्रत्येक व्यक्तीने या लोकात (भूलोकात), परलोकात आणि पुढील जन्मांत जीवनाचे कल्याण करण्यासाठी काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन मिळते. या जन्मात आपण अनेक प्रकारचे दु:ख सहन करत असतो. अशा दु:खमय संसारातून मुक्ती कशी मिळवायची, याविषयी केवळ सनातन धर्मातच योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळते. आपल्या सनातन धर्माचे मूळ असलेले वेद, शास्त्र, पुराणे, इतिहास मौल्यवान आहे. या ग्रंथांमध्ये आपल्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची योग्य प्रकारे उत्तरे मिळतात.

परकीय आक्रमणांमुळे हिंदूंच्या मनातील श्रद्धेला तडा !

भारतात अनादी काळापासून या धर्माचे आचरण करण्यात येत आहे. त्यातील प्रत्येक कृतीमागे विशेष कारण असते. यातील काही कारणे आपण जाणून घेऊ शकतो, तर काही जाणून घेण्याची क्षमता आपल्यात नसते. महर्षींनी दिव्य दृष्टी मिळवून या आचरणांविषयी आपल्याला उपदेश केला आहे. काही कारणे जाणून घेण्याची आपली क्षमता आहे आणि काहींची कारणे जाणून घेण्याची आपली क्षमता नाही. आपल्या पूर्वजांची धर्म आणि त्याचे आचरण यांवर मोठी श्रद्धा होती. अनुमाने १५० ते २०० वर्षांपूर्वीपर्यंत याविषयी लोकांच्या मनात दृढ श्रद्धा होती; कारण धर्माचरणामागील कारणे त्यांना माहिती होती. त्यामुळे ते श्रद्धेने सर्व अनुष्ठाने करत होते. काही वर्षांपूर्वीपासून लोकांच्या मनातील ही क्षमता अल्प होत चालली आहे. याचे कारण काही लोक बाहेरून येऊन आपल्या धर्मावर आक्रमण करत आहेत आणि ते येथील लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतियांमधील धर्माविषयी श्रद्धा अल्प होत चालली आहे. आता आपल्याला ही श्रद्धा जागृत करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी अशा अधिवेशनांची फार आवश्यकता आहे. असे काम प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे.

अशा कार्यक्रमांचे आयोजन सदैव होत रहावे !

सर्व सनातन धर्मियांमध्ये एकवाक्यता (मतैकता) असली पाहिजे. हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी आणि हिंदूंकडून धर्माचे आचरण होऊन धर्माचे रक्षण होण्यासाठी अशा अधिवेशनांची अतिशय आवश्यकता आहे. ‘विश्वाच्या कल्याणासाठी सनातन धर्मातील अत्यावश्यक तत्त्वांची या अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी, त्यांविषयी लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन सदैव होत रहावे’, असा आशीर्वाद आम्ही देत आहोत. हिंदु धर्मियांमध्ये जागृती करण्यासाठी या पवित्र कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जे लोक सहभागी होत आहेत, त्यांनाही नारायणस्मरणपूर्वक आशीर्वाद देत आहोत. दक्षिण दिशेला दक्षिणाम्नाय श्रृंगेरी शारदा पीठाचे ३६ वे आचार्य जगद्गुरु श्री श्री श्री भारती महास्वामी यांच्या कृपेने हे सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे संपन्न व्हावे. तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्वांचे कल्याण व्हावे.

शुभमस्तु !’

(जून २०२३)