वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात एकत्र आलेली शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी, गोवा येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !
रामनाथी (फोंडा), १६ जून (वार्ता.) – खालिस्तानी आतंकवाद, हिंदूंच्या सणांच्या दिवशी होणार्या दंगली, समलिंगी विवाहाचे समर्थन, ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’च्या व्यभिचाराला मान्यता, अश्लीलतेचे वाढते प्रस्थ यांसह अनेक समस्या हिंदूंपुढे आहेत. यांवर धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नाही. शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहे. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेचे लोकमंथन आहे. १० वर्षांपूर्वीच्या हिंदु राष्ट्राच्या विचारांच्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्याप्रमाणेच पुढील १० वर्षांनंतर वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या बीजातून हिंदु राष्ट्र साकारलेले दिसेल. या मंथनात संघटित झालेली हिंदु शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. फोंडा (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ जून या दिवशी प्रारंभ झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या (११ व्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या) उद्घाटनसत्रात हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. २२ जून पर्यंत चालणार्या या महोत्सवात राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या विविध विषयांवर मान्यवर त्यांचे विचार मांडणार आहेत.
या वेळी व्यासपिठावर बेंगळुरु (कर्नाटक) येथील लेखिका डॉ. एस्. आर्. लीला, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित विक्रम सावरकर आणि पटना, बिहार येथील विश्व ज्योतिष महासंघाचे सभापती आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र हे उपस्थित होते.
हिन्दू राष्ट्र से हिन्दू विश्व तक उद्घोष करने #Vaishvik_HinduRashtra_Mahotsav का गोवा परशुराम भूमि में प्रारंभ !
⛳ वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव – प्रथम दिवस
📡 For #LIVE :
🔸https://t.co/PfxhwvmJcu…#HinduRashtra_4_UniversalWelfare pic.twitter.com/Qn2leJfmVM
— Sunil Ghanwat (@SG_HJS) June 16, 2023
या वेळी मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले…
१. सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु जागृत होत आहेत; पण ‘भारताला हिंदु राष्ट्राकडे घेऊन जायचे असेल, तर धर्माच्या पक्षात कार्य केले पाहिजे’, हे सर्वच हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी लक्षात घ्यायला हवे.
२. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आतंकवाद्याकडे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राज्य करण्याच्या योजनेचे पुस्तक मिळाले. भारतातील मौलानाही इस्लामी राष्ट्राचा विचार मांडू लागले आहेत. भारताला इस्लामी राष्ट्र बनवू पहाणार्या या जिहाद्यांचे आव्हान भविष्यात हिंदु राष्ट्रापुढे असणार आहे.
३. सध्या देशभर चालू असलेल्या हिंदु राष्ट्राची जशी चर्चा होत आहे, तसे हिंदु राष्ट्राचे विरोधक विविध आक्षेप घेत आहेत. या आक्षेपांचे प्रत्युत्तर देण्याचे वैचारिक कार्य आपल्याला भविष्यात करायचे आहे.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे काय ?
‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे’, असे या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. |
असा झाला उद्घाटन सोहळा !
महोत्सवाच्या प्रारंभी सनातनचे पुरोहित श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन, गोंदिया येथील ‘तिरखेडी आश्रमा’चे संस्थापक पूज्य संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, बेलतरोडी (नागपूर) येथील ‘श्री गुरुकृपा सेवा आश्रमा’चे संचालक अध्यक्ष पू. भागीरथी महाराजजी, धुळे येथील ‘श्रीरामजानकी सेवा समिती आणि श्यामसुंदर गोवर्धन गोशाळे’चे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा आणि जयपूर (राजस्थान) येथील ‘ज्ञानम् फाउंडेशन’चे संस्थापक एवं अध्यक्ष महंत श्री दीपक गोस्वामी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर सनातनचे पुरोहित सर्वश्री अमर जोशी आणि सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्रपठण केले.
श्रृंगेरी येथील दक्षिणाम्नाय श्री शारदापिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांचे उत्तराधिकारी शिष्य जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांच्या शुभसंदेशाचे व्हिडिओद्वारे प्रसारण करण्यात आले. यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शुभसंदेशाचे वाचन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्याचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी कर्नाटक येथील पेजावर मठाचे पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांच्या संदेशाचे वाचन केले.
मान्यवरांच्या हस्ते ग्रंथांचे लोकार्पण !
या वेळी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या हिंदी आणि मराठी भाषेतील ग्रंथांचे भागवताचार्य (अधिवक्ता) श्री. राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पूज्य संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यासह ठाणे येथील ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे’ या मालिकेतील खंड १ ‘निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे श्री. दुर्गेश परुळकर, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यती माँ चेतनानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हिदु राष्ट्रासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती (एशिया चॅप्टर), विश्व ज्योतिष महासंघ, पाटलीपुत्र, बिहार
हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ हिंदूंसाठीच नाही, तर संपूर्ण अखिल मानवजातीसाठी आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र संपूर्ण मानवजातीला आणि सृष्टीला वाचवू शकते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हिदु राष्ट्रासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. येणारा काळ आपत्काळ असल्याने आपल्या रक्षणासाठी सर्वांनी साधना वाढवून सतर्कता ठेवणे आवश्यक आहे.
१. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. तेव्हा सर्व गोपींनी त्याला त्यांच्या काठ्याही लावल्या होत्या. तेव्हा त्यांना वाटले, ‘श्रीकृष्ण ही सर्व माया रचतो आहे.’ तेव्हा भगवंताने त्याची करंगळी थोडीशी बाजूला केली. तेव्हा पर्वत खाली आला आणि भगवंताने परत करंगळीवर पर्वत उचलला.
२. नंतर गोपींना वाटले, ‘भगवंताने पर्वत उचलला आहे, तर आपण काठ्या कशाला लावायच्या ?’ म्हणून त्यांनी काठ्या काढल्या. तेव्हाही पर्वत खाली आला. त्यावरून आपण कर्तव्य कर्म केले, तरच भगवंताची कृपा रहाणार आहे, हे स्पष्ट होते.
३. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापना भगवंत करणारच आहे; पण त्यासाठी आपल्यालाही आपले कर्तव्यही करावे लागणार आहे.
क्षणचित्र :वर्ष २०१८ मध्ये वाराणसी येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू असतांना हिंदूंच्या बाजूने श्रीरामजन्मभूमीचा निवाडा आला. हा फार चांगला संकेत आहे, असे आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र यांनी आवर्जून सांगितले. |