हिंदूंचा आवाज बुलंद करणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !
काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे भीषण वास्तव मांडणार्या ‘द कश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट सध्या भारतात प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने धर्मांधांच्या तावडीतून हिंदू युवतींच्या रक्षणासाठी हिंदूंनी जागृत होणे, धर्मशिक्षण घेणे आणि धर्मरक्षण करणे हे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व अधोरेखित झाले. लक्षवेधी म्हणजे या समस्येचे मूळ असणारे आणि धर्मांध शक्तींनी संपूर्ण जगात चालवलेले ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र समाजासमोर फारच उघडपणे समोर आले. या षड्यंत्राची दाहकता इतकी तीव्र आहे की, ते उघड करणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट देशात दाखवला जाऊ नये; म्हणून विरोधकांनी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतरही नेहमीप्रमाणे विशिष्ट समाजाचे उदात्तीकरण करण्यासाठी तमिळनाडू आणि बंगाल या राज्यांमध्ये राज्य सरकारकडून या चित्रपटावर बंदी घालण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला. इतरही राज्यांमध्ये चित्रपट मालकांना धमक्या देण्यात आल्या. या सर्वांवर मात करून आज हा चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित झाला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण जागृत होत असलेली हिंदु मने ! स्वातंत्र्योत्तर काळात हिंदु मनाचे ख्रिस्तीकरण, इस्लामीकरण, तसेच निधर्मीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळे जन्माने हिंदु; पण मन आणि विचार यांनी अहिंदु अशी लोकसंख्या वाढीस लागली. आता मात्र हे चित्र पालटत असून हिंदु मने जागृत होत आहेत. होणार्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे धाडस हिंदूंमध्ये होत आहेत. धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याची प्रेरणा हिंदूंना होत आहे. आज देशभरात हिंदु राष्ट्राची चळवळ जोर धरत आहे. ही जागृती होण्यामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करणार्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा मोलाचा वाटा आहे.
१. ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) म्हणत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे नोंदवणे, हे हिंदूंच्या विरोधातील मोठे षड्यंत्र !
आज हिंदु जागृत होऊन ते त्यांच्यावर होणार्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आहेत; पण हिंदूंकडून धर्मरक्षणासाठी दिलेल्या हाकाटीला ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) म्हणत हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य केले जात आहे. धर्मांध आणि साम्यवादी यांच्याकडून केल्या जाणार्या ‘हेट स्पीच’च्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठांच्या भाषणांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. ‘भारताचे तुकडे होऊ नये, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे’, हे ‘हेट स्पीच’ आहे का ? जर हिंदु आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? खरे तर हिंदु संस्कृतीत ‘हेट’ला (द्वेषाला) स्थान नाही. हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही घटना घडली नाही. तरीही प्रशासनावर दबाव आणून देशभरात हिंदूंच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. याउलट काही पंथांकडून ‘सर तन से जुदा’चे (डोके शरिरापासून वेगळे करणे) आवाहन करत अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या जातात; मात्र त्यांंच्या विरोधात तथाकथित ‘पुरोगामी’, ‘सेक्युलर’ (निधर्मीवादी) किंवा ‘पीस’वाले (शांतता राखू पहाणारे) यांनी याचिका प्रविष्ट केल्याचे दिसून येत नाही. एकूणच पोलीस आणि न्याययंत्रणा यांची दिशाभूल करून हिंदूंच्या विरोधात चाललेले हे मोठे षड्यंत्र आहे.
२. राजकीय पक्षांकडून हिंदुविरोधी भूमिका
निवडणुकांतही काही राजकीय पक्षांकडून हिंदुविरोधी भूमिका राबवली जात आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या घोेषणापत्रात काँग्रेस पक्षाने मुसलमान मतांच्या लांगूलचालनासाठी थेट ‘बजरंग दला’वर बंदी आणण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर आता काँग्रेसने गोहत्या बंदी, हिजाब बंदी आदी निर्णय मागे घेण्याची सिद्धता चालवली आहे. धर्मांधांकडून आता थेट हिंदूंचे कार्यक्रम आणि उत्सव यांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. पुढे जाऊन क्रूरकर्मा ‘टिपू’ आणि ‘औरंगजेब’ यांचे उदात्तीकरण चालू झाले आहे. शालेय पाठ्यपुस्तकांत आक्रमकांचा इतिहास पुन्हा शिकवण्याचा निर्णय घेतला जाईल. एकूणच हिंदूंना पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे, अशी स्थिती आहे.
३. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता
खरे तर भारतात हिंदू आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. गेल्या काही दशकांत निर्माण झालेले अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, तिबेट, म्यानमार, पाकिस्तान आदी देश भारतापासून तोडण्यात आले. यातील अनेक इस्लामी राष्ट्रे झाली. सध्या भारताचे इस्लामीकरण आणि ख्रिस्तीकरण करण्याचा प्रयोग चालू आहे. त्यामुळे भारतातील ९ राज्यांमध्ये (काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप) हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. तेथे हिंदूंना दुय्यम नागरिक म्हणून वागवले जात आहे. हिंदूंवर अत्याचार वाढल्याचे ‘मणीपूर’ येथे चालू असलेल्या हिंसक घटनांवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. एकूणच या देशाचे पुन्हा अनेक तुकडे करून देशाचे विभाजन केले जाईल, या धोक्याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले नाही, तर भारताचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही.
४. हिंदूंना जागृत करण्यात अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची महत्त्वाची भूमिका
हिंदूंच्या विरोधात केल्या जाणार्या या विविध षड्यंत्रांचा बुरखाफाड करण्यामध्ये ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’चा मोठा वाटा आहे. वर्ष २०१२ मध्ये गोवा येथे ‘पहिले अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. पहिल्या अधिवेशनापासून आजतागायत ‘हिंदु राष्ट्राचा उद़्घोष’, ‘हिंदूजागृती’ आणि ‘हिंदूसंघटन’ हाच अधिवेशनांचा गाभा राहिला आहे. पूर्वी हिंदु राष्ट्र म्हटले की, त्याकडे नकारात्मक आणि जातीय दृष्टीने पाहिले जायचे; पण आज मात्र तळागाळातील हिंदूही हिंदु राष्ट्राला समर्थन देत आहेत. याचे कारण हिंदु धर्माची सर्वसमावेशकता आणि विश्वकल्याणकारी संकल्पना ! अन्य पंथ काफिरांना ठार मारण्याच्या वल्गना करतात किंवा संपूर्ण जगाला येशूमय करण्याची स्वप्ने पहातात. हिंदु मात्र विश्वकल्याणाचे पसायदान मागतात. आज विदेशांमध्येही हिंदुत्वाविषयी आकर्षण वाढत आहे, ते हिंदु धर्माच्या कल्याणकारी तत्त्वज्ञानामुळेच ! हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी जागृती करतांना हिंदु धर्म आचरणात आणण्याच्या दृष्टीने जागृती करण्यातही अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
५. अधिवेशनाच्या माध्यमातून होणारे कार्य
निधर्मी व्यवस्थेत हिंदूंचे रक्षण करायचे असेल, तर केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदूसंघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन हे त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून भारतातील संत महात्मे, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, मंदिरांचे विश्वस्त आदींच्या उपस्थितीत गोवा येथे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने विचारमंथन होण्याच्या जोडीला हिंदुत्वाचे कार्य करतांना येणार्या चांगल्या-वाईट अनुभवांचे आदानप्रदान होते, तसेच वर्षभरासाठी हिंदुत्वाच्या कार्याची दिशा ठरवली जाते. देश-विदेशातील ३०० हून अधिक अग्रणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहभागामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राला मूर्त स्वरूप येण्याची प्रक्रिया घडत आहे.
६. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन
यंदाही १६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होत आहे. त्यामध्ये लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र, भूमी (लँड) जिहाद, काशी-मथुरा मुक्ती, धर्मांतरण, गोहत्या, मंदिर संस्कृतीचे रक्षण, काश्मिरी हिंदूंचे मायभूमीत पुनर्वसन, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार यांसारख्या विविध जिहादी आक्रमणांसह हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक आगामी महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन होईल, तसेच कृतीचा आराखडाही सिद्ध केला जाईल. आजवर केलेल्या आंदोलनांमध्ये समस्त हिंदूंना मिळत असलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन समस्त हिंदूंसाठी अत्यंत उत्साहाचे ठरेल, यात शंका नाही.
संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (३१.५.२०२३)
या महोत्सवाचे हिंदु जनजागृती समितीच्या यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून, तसेच समितीच्या संकेतस्थळावरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. लाईव्ह प्रक्षेपणाच्या लिंक पुढीलप्रमाणे : |