(म्हणे) ‘सांस्कृतिक नरसंहार’ !
नुकताच पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेकदिनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यावर १९६१ पर्यंत ४ शतके राज्य करणार्या पोर्तुगिजांनी राज्यातील मंदिरे उद़्ध्वस्त केली. गोव्यातील माजी वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या सर्व खुणा पुसून टाकल्या पाहिजेत.’’ भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान पुरोगाम्यांना खटकले नसते, तरच नवल होते. जणू काही येथील पुरोगाम्यांचे पूर्वज पोर्तुगीज असल्याप्रमाणे त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. ‘आक्रमणकर्त्या पोर्तुगिजांच्या खुणा पुसणे म्हणजे महापाप’, अशा आविर्भावात त्यांनी हा ‘सांस्कृतिक नरसंहार’ (कल्चरल जेनोसाईड) असल्याचा आरोप मुख्यमंत्री सावंत यांच्यावर केला.
वसाहतवादी पोर्तुगिजांनी संपूर्ण कालखंडांत हिंदूंच्या मंदिरांची करता येईल तेवढी तोडफोड केली, हिंदूंची धर्मांतरे केली. ‘इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ) चा काळाकुट्ट इतिहास ही हिंदूंवरील अत्याचारांची कधीही भरून न निघणारी जखम आहे. आता पुरोगाम्यांनी हे सांगितले पाहिजे की, गोव्यात हिंदूंचाच खरा ‘सांस्कृतिक आणि प्रत्यक्षातीलही नरसंहार’ हा कुणी केला ? तर अर्थात्च पोर्तुगिजांनी ! धर्मांतराला नकार देणार्या सहस्रो हिंदूंना आगीत ढकलण्यासह त्यांना अत्यंत क्रूरतेने मारले आणि या नरसंहाराला घाबरून अनेकांनी धर्मांतरे केली. सहिष्णु हिंदूंची ‘कल्चरल जेनोसाईड’ करण्याची वृत्ती नाहीच (ती असती, तर अन्य पंथांचे लोक हिंदूंच्या डोक्यावर कसे बसले असते ?); पण पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचारांच्या खुणा मुख्यमंत्र्यांनी पुसायला सांगितल्या, तर त्यात पुरोगाम्यांच्या पोटात का दुखते ? आजही पोतुर्गालशी घनिष्ठ नाते सांगणार्या गोवेकरांच्या निष्ठा कुणाशी आहेत, हेही गोवा शासनाने पडताळायला हवे.
आता या खुणा पुसणे, हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य राहील. मुख्यमंत्र्यांनी त्या दिशेने पावले उचलली, तर हिंदू त्याचे स्वागतच करतील !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.