हिंदु संघटना स्‍थापन करण्‍याच्‍या उद्देशाचे महत्त्व !

आजपासून श्री रामनाथ देवस्‍थान, गोवा येथे चालू होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

‘हिंदूसंघटनाच्‍या दृष्‍टीने विविध राज्‍यांमध्‍ये प्रवास होतो. तेव्‍हा त्‍या राज्‍यांतील विविध हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्‍या भेटी होतात. त्‍या भेटींमध्‍ये लक्षात आलेली एक महत्त्वाची गोष्‍ट, म्‍हणजे हिंदु संघटनांच्‍या कार्यकर्त्‍यांनाच नव्‍हे, तर पदाधिकार्‍यांनाही त्‍यांच्‍या संघटनेच्‍या स्‍थापनेचा उद्देश  सुस्‍पष्‍टपणे ठाऊक नसतो. तसेच त्‍यांना हिंदूंचे रक्षण किंवा हिंदु धर्माचे रक्षण म्‍हणजे काय ? यांविषयीही सुस्‍पष्‍टता नसते. आमचे हिंदु बांधव मोठ्या कष्‍टाने संघटना उभारून हिंदु धर्म, हिंदू आणि राष्‍ट्र यांच्‍या रक्षणासाठी धडपडत असतात; परंतु योग्‍य दिशादर्शनाच्‍या अभावी त्‍यांची फलश्रुती अत्‍यंत अल्‍प रहाते. त्‍यांना त्‍यांचे ध्‍येय फार दूर असल्‍याचे भासत असल्‍याने त्‍यांच्‍या कार्याविषयी निराशा येते. त्‍या अनुषंगाने हा लेखप्रपंच.

नेपाळमधील बौद्ध गुरु लामा घ्याछो रिम्पोछे यांच्याशी वार्तालाप करताना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. हिंदूंचे स्‍वधर्माविषयीचे अज्ञान, हा हिंदूसंघटनातील मुख्‍य अडथळा

हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना वैयक्‍तिक भेटीमध्‍ये ‘तुमचा हिंदु संघटना स्‍थापनेचा उद्देश काय ?’ किंवा ‘तुमच्‍या संघटनेची ध्‍येय धोरणे काय ?’, असा प्रश्‍न विचारला असता ते सांगतात, ‘‘त्‍यांच्‍या भागात हिंदूंच्‍या रक्षणासाठी कुणीच नाही. दंगल होते, तेव्‍हा हिंदूंचे रक्षण झाले पाहिजे. त्‍यामुळे हिंदूंच्‍या रक्षणासाठी हिंदु संघटना स्‍थापन केली आहे.’’ त्‍यानंतर त्‍यांना पुढील काही प्रश्‍न विचारून त्‍यांचे कार्य, हिंदुत्‍व आणि हिंदु धर्म यांविषयी त्‍यांची सुस्‍पष्‍टता जाणून घेतली, उदा. ‘एखादा व्‍यक्‍ती हिंदु आहे, हे आपण कशावरून ठरवतो ? त्‍याच्‍या केवळ जन्‍मावरून कि जन्‍मासह त्‍याच्‍या आचरणातून ? हिंदु म्‍हणून एका व्‍यक्‍तीने वैयक्‍तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्‍ये धर्माचरण म्‍हणून कोणत्‍या कृती केल्‍या पाहिजेत ? एक हिंदु म्‍हणून आपण एखाद्या व्‍यक्‍तीला आपल्‍या धर्माविषयी किमान कोणत्‍या गोष्‍टींची माहिती दिली पाहिजे ?’, आदी प्रश्‍न विचारले. बहुतांश हिंदु संघटनांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना या प्रश्‍नांच्‍या उत्तरांसबंधी फारच जुजबी माहिती असल्‍याचे लक्षात आले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. शालेय अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षण देण्‍यासाठी अल्‍पसंख्‍यांक आणि बहुसंख्‍यांक असा भेद करणारे शासनकर्ते !

एकूणच हिंदूंना स्‍वधर्मशिक्षण घेणे आवश्‍यक आहे. त्‍यातून स्‍वधर्मबोध आणि स्‍वराष्‍ट्रबोध होणे सहज शक्‍य होते. स्‍वबोध झाल्‍याने खर्‍या अर्थाने देश आणि धर्म यांचे शत्रू कोण ? आणि मित्र कोण ? यांचा बोध होणे शक्‍य होते. एकूणच स्‍वबोध केल्‍यानंतर स्‍वकीय आणि परकीय यांच्‍यातील शत्रूबोध अन् मित्रबोध होतो. त्‍यामुळे देश आणि धर्म यांचे रक्षण करण्‍यासाठी वैचारिक आणि बौद्धिक बळ मिळते. असे असतांना  राज्‍यघटनेचा चुकीचा अर्थ लावून संपूर्ण भारताच्‍या शालेय अभ्‍यासक्रमामध्‍ये बहुसंख्‍यांक हिंदूंना धर्मशिक्षणाचा अधिकार नाकारण्‍यात आला. सर्वपक्षीय सरकारांची ही कृती राज्‍यघटनेच्‍या समानता स्‍थापित करण्‍याच्‍या आश्‍वासनाला हरताळ फासणारी आहे.

३. स्‍वबोधाखेरीज मित्रबोध आणि शत्रूबोध हा हिंदु संघटनांसाठी विनाशकारी भ्रम

बर्‍याच हिंदु संघटना प्रसार करतांना किंवा अन्‍य संघटनांशी बोलतांना सांगतात, ‘‘तुम्‍हाला इस्‍लाम धर्म आणि कुराण यांविषयीची माहिती पाहिजे. ही माहिती नसेल, तर तुम्‍ही ‘गझवा-ए-हिंद’, ‘दारुल-ए-इस्‍लाम’, ‘इसिस’, ‘अल्-कायदा’ आदी संघटनांचा जागतिक आणि स्‍थानिक जिहाद तुम्‍हाला कळणार नाही अन् तुम्‍ही हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही. काही हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना म्‍हणतात, ‘‘तुम्‍हाला ‘ख्रिस्‍तीयत’विषयी माहिती हवी. बायबलमध्‍ये काय लिहिले आहे, त्‍याविषयी माहिती असली पाहिजे, तरच तुम्‍ही ख्रिस्‍त्‍यांच्‍या धूर्त प्रसाराचा त्‍यांच्‍या जागतिक स्‍तरावर चाललेल्‍या धर्मांतराचा प्रतिकार करू शकता.’’ संख्‍या वाढवून जगाला ख्रिस्‍तमय करणे, हे पोपसह सर्व ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांचे स्‍वप्‍न आहे. ही सूत्रे योग्‍य असली, तरी एका हिंदु संघटकाला स्‍वधर्माविषयी किमान आवश्‍यक माहिती नसेल आणि अन्‍य पंथिंयांविषयी अधिक माहिती असेल, तर ही स्‍थिती पाया नसलेल्‍या इमारतीसारखी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. अशाने हिंदु धर्म आणि भारत यांचे दूरगामी रक्षण शक्‍य नाही. एकूणच स्‍वबोधाखेरीज मित्रबोध आणि शत्रूबोध हा हिंदु संघटनांसाठी एक विनाशकारी भ्रम ठरत आहे.

४. धर्मशिक्षण न मिळणार्‍या हिंदूंची विदारक स्‍थिती !

एखाद्या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या दैनंदिन किंवा कौटुंबिक जीवनामध्‍ये धर्माचे प्रत्‍यक्ष आचरण करून धर्म जिवंत ठेवण्‍यासाठी सतत प्रयत्नशील रहाणे आवश्‍यक आहे. इतकेच नव्‍हे, तर धर्मशास्‍त्र, वैयक्‍तिक आणि सामाजिक धार्मिक कृतींमागील उद्देश अन् त्‍यांची कारणमीमांसा यांची माहिती करून घेतली पाहिजे. उलट बहुतांश हिंदु संघटनांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना वैयक्‍तिक आचरणातून प्रतिदिन हिंदु धर्माचे रक्षण कसे करावे ? याविषयी काहीही माहिती नसते. हे धर्मावरील एक संकटच आहे.

मी एका राज्‍यात गेलो तेव्‍हा एका शहरामध्‍ये एका संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांशी संपर्क झाला. तेव्‍हा बरेच जण म्‍हणाले की, त्‍यांना मंदिरांंमध्‍ये जायला, तसेच नोकरी व्‍यवसायांमुळे नियमितपणे सण आणि उत्‍सव साजरे करायलाही वेळ नसतो. त्‍यांना त्‍यांचा वाढदिवस इंग्रजी दिनांकाच्‍या ऐवजी भारतीय पंचांगातील तिथीनुसार साजरा केला पाहिजे, हेही माहिती नव्‍हते. त्‍यामुळे स्‍वबोध नाही आणि धर्मशिक्षण नसल्‍याने स्‍वधर्म आचरणाची तळमळ नाही. आपण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत आहोत, याचीही त्‍यांना जाणीव नाही. यावर सर्वांनी विचार करण्‍याची वेळ आली आहे. हिंदु संघटनांच्‍या पदाधिकार्‍यांची ही स्‍थिती आहे, तर सर्वसामान्‍य हिंदूंची काय स्‍थिती असेल, त्‍याची कल्‍पना न केलेली बरी ! गेल्‍या ७५ वर्षांमध्‍ये हिंदूंना शालेय अभ्‍यासक्रम किंवा देवालये यांच्‍या माध्‍यमातून धर्मशिक्षण मिळाले नाही. त्‍यामुळे त्‍यांची अशी विदारक स्‍थिती झाली आहे.

५. हिंदूंच्‍या शरिरासह त्‍यांचे मन आणि आत्‍मा यांचेही रक्षण करणे आवश्‍यक !

मी अनेकांना ‘आपण हिंदु संघटनेची स्‍थापना कशासाठी करतो ?’, असा प्रश्‍न विचारला. तेव्‍हा बहुतांश संघटनांच्‍या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, त्‍यांनी हिंदूंच्‍या रक्षणासाठी आणि हिंदूंच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी हिंदु संघटना उभारली आहे. थोडक्‍यात दंगल झाल्‍यास हिंदूंचे रक्षण करता यावे, यासाठी बहुतांश हिंदु संघटना स्‍थापन झाल्‍या आहेत, ते लक्षात येते. त्‍यामुळे बहुतांश हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांकडे हिंदु मन, हिंदु आत्‍मा, हिंदु संस्‍कृती, हिंदु परंपरा, धर्मशास्‍त्र किंवा धर्मग्रंथ यांच्‍या रक्षणाचा कोणताही उद्देश आणि योजना नाहीत.  मग रक्षण कशाचे करायचे ? हेच ठाऊक नसेल, तर हिंदु धर्माचे रक्षण कसे करणार ? सध्‍या वेशभूषा, आहार-विहार, भाषा, इतिहास आणि विचारप्रक्रिया या सर्व पाश्‍चात्त्य विचारसरणीच्‍या आहेत. नेमके सांगायचे झाल्‍यास त्‍यांवर ख्रिस्‍ती आणि साम्‍यवादी यांचा प्रभाव आहे. जोपर्यंत कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, खरा इतिहास, संस्‍कृती, परंपरा, साधना आणि मनुष्‍य जन्‍माची ध्‍येयप्राप्‍ती यांविषयी हिंदु संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अन् सामान्‍य हिंदू यांना ज्ञान होणार नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने हिंदु धर्मरक्षण होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. दंगलीच्‍या घटनांमध्‍ये हिंदूंच्‍या शरिराचे रक्षण आवश्‍यकही आहे. तसेच प्रत्‍येक हिंदूने प्रतिदिन वैयक्‍तिक धर्माचरण करण्‍यासह सामाजिक स्‍तरावर विविध धार्मिक उत्‍सवांचे आयोजन करून हिंदूसंघटन आणि धर्मरक्षण करणेही आवश्‍यक असते.

६. तीन पिढ्यांचे संघटन आणि परंपरा रक्षण !

हिंदु धर्मामध्‍ये आपल्‍या पंचांगानुसार ३६५ दिवसांपैकी साधारण १५० दिवस काहीतरी धार्मिक कार्यक्रम सांगितले आहेत. त्‍यात सण, उत्‍सव, व्रते, तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव आणि नवरात्रोत्‍सव इत्‍यादींचा समावेश आहे. यांच्‍या माध्‍यमातून वर्षातील एक तृतीयांश दिवस वैयक्‍तिक, कौटुंबिक आणि शक्‍य असल्‍यास सामाजिक स्‍तरावर धर्मशास्‍त्रानुसार कार्यक्रमांचे आयोजन करून धर्मरक्षण होण्‍याचे फार महत्त्व आहे. हे साजरे करत असतांना हिंदूंनी त्‍या दिवशी कुटुंब किंवा समाज यांमध्‍ये एकत्रितपणे सण किंवा धार्मिक कार्यक्रम साजरा करण्‍यामागील आध्‍यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक आदी उद्देशांविषयी अभ्‍यासपूर्ण चर्चा करावी. हे उत्‍सव सातत्‍याने धर्मशास्‍त्राप्रमाणे साजरे केल्‍याने भावी पिढींतील मुलांना धर्म संस्‍कारांचे बाळकडू मिळते. त्‍यामुळे हिंदूंचे मन धर्मपरायण होते आणि यालाच हिंदू मन अन् आत्‍मा यांचे रक्षण म्‍हणू शकतो.

७. धर्माचरणी समाज हा हिंदु राष्‍ट्राचा (रामराज्‍याचा) पाया !

नित्‍य, नैमित्तिक आणि प्रासंगिक धार्मिक आचरणामुळे केवळ व्‍यक्‍ती नव्‍हे, तर कुटुंब आणि समाजही धर्मपरायण होतो. धर्माचरणाने प्रतिदिन वैयक्‍तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्‍तरावर आपोआप धर्मरक्षणाचे कार्य होत असते. त्‍यामुळे खर्‍या अर्थाने हिंदु मन, संस्‍कार, धर्मशास्‍त्र आणि संस्‍कृती यांचे रक्षण होते. या धर्मरक्षणाच्‍या कार्यामध्‍ये हिंदूंची स्‍त्रीशक्‍ती सतत कृतीशील रहाते. एक स्‍त्री संपूर्ण कुटुंबाला धर्मशिक्षित करून धर्मरक्षणाचे कार्य करू शकते. जेव्‍हा घरात अशा प्रकारचे धर्ममय वातावरण असते, तेव्‍हा मुलांना बालपणीच धर्माचे संस्‍कार मिळतात. अशी धर्मसंस्‍कारी युवा हिंदु पिढी कोणत्‍याही हिंदुविरोधकाच्‍या प्रश्‍नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. हिंदु कुटुंबातील मुलगी धर्मशिक्षित झाल्‍यामुळे संभाव्‍य ‘लव्‍ह जिहाद’ आपोआप टळतो. यासमवेतच हिंदु धर्मावर होणारे वैचारिक आणि बौद्धिक आघात यांविषयी नवीन पिढीशी वेळोवेळी चर्चा करणे आवश्‍यक ठरते. त्‍यांविषयी मुलांना योग्‍य उपायात्‍मक दृष्‍टीकोन देऊन सतत धर्मशिक्षित केले, तर भविष्‍यातील धर्मरक्षण करणारे धर्मवीरच निर्माण होतील, यात काही शंका नाही.

हिंदूंचे संघटन बलशाली झाल्‍यामुळे दंगलींसारख्‍या प्रसंगातही ते संघटित राहून प्रशासनासमवेत स्‍वत:सह इतरांचे रक्षण करण्‍यात सक्षम होतील. त्‍यासाठी आपल्‍या युवा पिढीला सक्‍तीचे स्‍वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. त्‍यामुळे हिंदु मन, हिंदु आत्‍मा, हिंदु संस्‍कृती आणि परंपरा आदी सर्वांच्‍या रक्षणासाठी हिंदु संघटना उभारली पाहिजे.

८. जन्‍महिंदु नाही, तर साधनेसह धर्माचरण करणारा कर्महिंदू खरा बलशाली ! 

सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे प्रत्‍येक हिंदू, हिंदु संघटनेचा प्रत्‍येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी वैयक्‍तिक जीवनामध्‍ये साधना करणे आवश्‍यक आहे. बरेचदा साधना किंवा अध्‍यात्‍म म्‍हटल्‍यानंतर ‘हे साधू संन्‍याशांचे काम आहे’, असे हिंदु समाजाला वाटते. तसेच ‘हे निवृत्तीनंतर करायचे कार्य आहे, ते केवळ ब्राह्मणांनी करायचे असते, इतरांना याची आवश्‍यकता नाही’, असा सर्वत्र भ्रम जोपसलेला जातो. आपल्‍या अंतरातील दिव्‍यता जागृत करण्‍याला साधना म्‍हणतात आणि ते सर्वांनीच केले पाहिजे. साधनेमुळे साधकाचे मनोबल वाढते आणि त्‍याची आत्‍मशक्‍ती जागृत होते. या दिव्‍य शक्‍तीच्‍या आधारे हिंदु धर्म किंवा देवभूमी भारत यांचे रक्षण करणे हिंदूंना सहज शक्‍य होणार आहे. केवळ जन्‍महिंदु बलशाली नसतो, तर साधना करत धर्माचरण करणारा कर्महिंदू हा खरा बलशाली असतो.

सध्‍या ‘हिंदू हा जगातील सर्वांत लढवय्‍ये आणि सहिष्‍णु समाज आहे’, असा एक फुकटचा अभिमान बाळगला जातो; परंतु हे चूक आहे. ‘साधना करणारा आणि धर्माचरणी हिंदू हाच जगातील सर्वांत लढवय्‍या अन् सहिष्‍णु समाज आहे’, असे सांगायला पाहिजे. महाभारताच्‍या युद्धामध्‍ये कौरव अणि पांडव असे दोन्‍ही बाजूने हिंदू होते. कौरवांकडे साधक वृत्तीच्‍या धर्मचरणी पांडवांच्‍या तुलनेत सैन्‍य संख्‍याबल, सैन्‍य बाहुबली, शस्‍त्रबल, धनबल आदी कैकपटीने अधिक होते. सध्‍याची स्‍थिती पाहिली, तर त्‍या वेळी बलाढ्य हिंदू म्‍हणून जन्‍महिंदु कौरवांचा विजय व्‍हायला पाहिजे होता; परंतु साधना करणारे, धर्मनिष्‍ठ असलेले, भगवान श्रीकृष्‍णाला स्‍वपक्षामध्‍ये ठेवणारे मूठभर पांडव विजयी झाले. यावरून जन्‍महिंदूंपेक्षा कर्महिंदू-साधक हिंदू अधिक बलशाली असतात, हे लक्षात येते.

९. प्रार्थना !

मी भगवान श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी प्रार्थना करतो की, सर्व हिंदू व्‍यक्‍ती, सर्व संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना धर्मशिक्षण घेऊन धर्मानुसार प्रत्‍यक्ष आचरण करण्‍याची अन् हिंदूंच्‍या संघटित शक्‍तीद्वारे सनातन हिंदु धर्म आणि देवभूमी भारत यांचे रक्षण करण्‍याची सद़्‍बुद्धी आणि बळ द्या. आमच्‍या माध्‍यमातून आपण करत असलेल्‍या धर्मसंस्‍थापनेच्‍या या कार्यामध्‍ये आमचे योगदान करून घ्‍यावे, हीच आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.

– (सद़्‍गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती