छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौरांचा बूट चोरीला !
महापालिका यंत्रणा लागली कामाला; ३ संशयित कुत्रेही पकडले !
छत्रपती संभाजीनगर – येथील इटखेडा भागातील निवासस्थानासमोर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत:चा १५ सहस्र रुपयांचे बूट काढून ठेवले होते. या वेळी घराच्या दारासमोरून जाणार्या भटक्या कुत्र्याने एक बूट पळवला. हा बूट शोधण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लावण्यात आली. महापालिकेच्या कर्मचार्यांनी ३ संशयित कुत्र्यांना पकडले; पण बूट नेमका कोणत्या कुत्र्याने पळवला याचा शोध कसा घ्यावा ? असा प्रश्न या यंत्रणेला पडला आहे. (नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने अशाच पद्धतीने भटक्या कुत्र्यांना पकडल्यास शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या मिटून जाईल. – संपादक)
जेव्हा घोडेले यांना दारासमोर ठेवलेला बूट दिसून आला नाही, त्या वेळी त्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला; पण बूट काही सापडत नव्हता. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीचे चित्रण पडताळले. ज्यात त्यांचा बूट घराच्या दारासमोरून २ भटक्या कुत्र्याने पळवला असल्याचे समोर आले. घोडेले यांनी तात्काळ महापालिकेच्या पशूसंवर्धन विभागाला दूरभाष करून परिसरात मोकाट श्वान वाढले असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. समवेतच स्वत:चा बूट श्वानाने नेल्याचीही तक्रार केली. त्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ परिसरातील संशयित कुत्र्यांची धरपकड चालू केली. (इतर वेळी नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा तत्परतेने भटक्या कुत्र्यांना पकडते का ? महापालिकेची यंत्रणा जनतेसाठी कि केवळ लोकप्रतिनिधींसाठी आहे ? असा प्रश्न कुणालाही पडल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|