खलिस्तानी समर्थक अवतारसिंह खांडा याचा ब्रिटनमध्ये मृत्यू
भारतीय तिरंग्याच्या अवमान प्रकरणी होता आरोपी
चंडीगड – खलिस्तानी समर्थक आणि अटकेत असलेला खलिस्तानी अमृतपाल सिंह याचा जवळचा म्हणून ओळखला जाणारा अवतारसिंह खांडा याचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याला एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये भारतीय तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या अवमानाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करत आहे. ज्येष्ठ कॅनेडियन लेखक गुरप्रीतसिंह सहोता यांनी त्याच्या निधनाला दुजोरा दिला आहे.
खालिस्तानी अमृतपाल का सहयोगी अवतार सिंह की ब्रिटेन में मौत#AvtarSinghKhanda #Amritpal https://t.co/HCphRyD7X3
— India TV (@indiatvnews) June 15, 2023
अवतारसिंह खांडा याचे कुटुंब मोगा येथे रहाते. वर्ष २०१४ मध्ये खांडा ब्रिटनमध्ये गेला होता. काही काळापूर्वी अमृतपाल प्रकरणाचे अन्वेषण चालू असतांना सुरक्षायंत्रणांनी त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. वर्ष १९८८ मध्ये अवतारसिंह खांडा याचे काका बलवंतसिंह खुराणा सुरक्षादलाच्या चकमकीत मारले गेले होते. त्यानंतर वर्ष १९९१ मध्ये खांडाचे वडील कुलवंतसिंह खुराणाही सुरक्षादलाच्या चकमकीत ठार झाले होते. खांडाचे वडील आणि काका दोघेही खलिस्तानी आतंकवादी संघटनेचे सक्रीय सदस्य होते. खांडाचे मामा गुरजंतसिंह बुधसिंहवाला हे ‘खलिस्तानी लिबरेशन फोर्स’चे प्रमुख होते.