‘टोलमुक्त कृती समिती’सह सर्वपक्षियांच्या आंदोलनानंतर ओसरगाव येथील टोल वसुलीला तात्पुरती स्थगिती !
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावर १४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला आरंभ करण्यात आला; मात्र सकाळी १० वाजता टोलनाक्यावरील तांत्रिक बिघाडाचे कारण देत टोल वसुली थांबवण्यात आली. दुसरीकडे ‘टोलमुक्त कृती समिती’सह सर्वपक्षीय राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी टोलनाक्यावर येऊन ‘टोल वसुली होऊ देणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्या वेळी टोल वसुली आस्थापनाच्या व्यवस्थापकाने टोल वसुलीला होणारा विरोध लक्षात घेता ‘टोल वसुली तूर्तास करू शकत नाही’, असे पत्र महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले आणि त्या पत्राची एक प्रत ‘टोलमुक्त कृती समिती’ला दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र ‘या तात्पुरत्या स्थगितीवर आम्ही समाधानी नसून टोल वसुली चालू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलकांनी दिली.
टोलवसुली बंद करण्यासाठी ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली.महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होत नाही तसेच एम. एच.०७ गाडयांना टोलमाफी होत नाही तोपर्यंत टोल सुरु करायचा नाही अशा सक्त सूचना टोल कंपनीच्या व्यवस्थापकांना दिल्या.टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. pic.twitter.com/7lns9NfduV
— Vaibhav Naik (@VaibhavNaikMLA) June 14, 2023
या आंदोलनाच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक, ‘टोल मुक्त कृती समिती’चे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर, सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजपचे मनोज रावराणे, ओसरगावच्या सरपंच सुप्रिया कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.