भावजागृती प्रयोगाच्या माध्यमातून साधकांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणे
‘एकदा नंदुरबार येथील सकाळी होणार्या नामसत्संगात मी भावजागृतीचा प्रयोग घेतला.
‘जगद़्गुरु भगवान श्रीकृष्ण, परम श्रेष्ठ गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चरणी नतमस्तक होऊन भावार्चना करूया. आज वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने वैकुंठ लोकाचे वैभव पाहूया आणि वैकुंठात नांदणार्या श्रीहरिचे आपण भावपूर्ण दर्शन घेऊया. श्रीहरिच्या नामाचा गजर करत आपण भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमात नुकतेच येऊन पोचलो आहोत. तेथे आपल्याला काय जाणवले ? आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे अंतर्मनातून निरीक्षण करूया.
१. ‘वैकुंठाचे नाव घेताक्षणी हवेमध्ये गारवा जाणवत आहे.
२. आपल्या मनामध्ये उत्साह, चैतन्य आणि आनंद ओसंडून वहात आहे. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’ अशी आपली अवस्था झाली आहे. याच अवस्थेत आपण पुढे पुढे जात आहोत.
३. अनेक जन्मांपासून देहाला चिकटलेली स्वभावदोष आणि अहंरूपी वस्त्रे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने एकेक करून गळून पडणे आणि चैतन्यमय दिव्य वस्त्रे देहावर दिसणे
अनेक जन्मांपासून आपल्या देहाला चिकटलेली स्वभावदोष आणि अहंरूपी वस्त्रे गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने एकेक करून गळून पडत आहेत. त्यामुळे आपल्या देहातील जडत्व न्यून होत आहे. विष्णुस्मरणाने एकेक वस्त्रे गळून पडली आणि चैतन्यमय दिव्य वस्त्रे आपल्या देहावर दिसत आहेत.
४. ‘श्री विष्णवे नमः ।’ असा नामजप करत वैकुंठाच्या द्वाराशी येणे आणि आत प्रवेश केल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे दर्शन घेतल्यावर त्यांनी आशीर्वाद देणे
आपण ‘श्री विष्णवे नमः ।’ असा नामजप करत वैकुंठाच्या द्वाराशी आलो आहोत. तिथे जय-विजय हे द्वारपाल श्रीविष्णूच्या सेवेसाठी दक्ष आहेत. त्यांना नमस्कार करून आपण आत प्रवेश करत आहोत. आपण प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे दर्शन घेतले. त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला.
५. त्यानंतर आपण श्रीकृष्णाच्या चित्राचे भावपूर्ण दर्शन घेत आहोत. त्याचे सुदर्शनचक्र वेगाने फिरत असल्याचे आपण अनुभवत आहोत. आपल्या सभोवतालचे सर्व आवरण नष्ट झाले आहे.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महाविष्णूच्या रूपात शेषाच्या आसनावर विराजमान झालेले रूप हृदय मंदिरात साठवणे आणि त्यांनी ‘तुमची केव्हापासून वाट पहात आहे’, असे सांगणे
एकेक पायरी चढत आता आपण गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कक्षाकडे आलो आहोत. आपण आतमध्ये जात आहोत. बघतो, तर काय साक्षात् गुरुदेव महाविष्णूच्या रूपात शेषाच्या आसनावर विराजमान झाले आहेत. त्यांचे ते शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले रूप आपण हृदयमंदिरात साठवत आहोत. आपण त्यांना आत्मनिवेदन करत आहोत. गुरुदेव म्हणत आहेत, ‘किती उशीर केलात ! मी केव्हापासून तुम्हा सर्व साधकांची वाट पहात आहे.’ गुरुदेवांनी आपल्याला बसण्यासाठी सांगितलेे. आपण सर्व जण गालिच्यावर बसत आहोत.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या मनाची स्थिती जाणत असल्याने त्यानुसार त्यांनी साधनेविषयी मार्गदर्शन करणे आणि ते साधकांच्या समवेत असल्याविषयी आश्वासन देणे
गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. ते साधकांच्या मनाची स्थिती जाणत असल्याने सांगत आहेत, ‘काळजी करू नका. हा थोडासा आपत्काळ कठीण आहे. तो निघून जाईल. केवळ साधना आणि सेवा यांकडे लक्ष द्या.’ गुरुमाऊली ‘मी तुमच्या समवेत आहे’, असे सांगून आपल्याला आश्वस्त करत आहेत. आपले मन भरून आले आहे. आपण श्रीविष्णूची मानसपूजा करत आहोत. त्यानंतर आपण प.पू. गुरुदेवांच्या चरणी कमलपुष्पांची पुष्पार्चना करून अनंत वेळा कृतज्ञता व्यक्त करत आहोत.
हे गुरुमाऊली, भावजागृतीच्या प्रयोगातून निर्माण झालेला आम्हा सर्व साधकांचा कृतज्ञताभाव सातत्याने जागृत ठेवा’, अशी आपल्या चरणी आर्तभावाने प्रार्थना करतो.’
– सौ. निवेदिता जोशी, (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५० वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |