सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’तील अडथळे दूर होण्यासाठी नामजपादी उपाय करतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘११.५.२०२३ या दिवशी होणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमातील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील संतांनी नामजपादी उपाय केले. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८३ वर्षे)
अ. ‘नामजप करत असतांना आरंभीपासूनच माझा भाव जागृत होत होता.
आ. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी अर्धा घंटा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना बरे वाटत नाही’, असा निरोप मला मिळाला. त्या वेळी मी नामजप करत असतांना माझा जप पुष्कळ त्वेषाने होऊ लागला.’
२. पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे)
‘११.५.२०२३ या दिवशी होणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रथामध्ये बसल्यावर त्या तिघांचे रक्षण व्हावे, या कार्यक्रमातील अडथळे दूर व्हावेत अन् कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी मला त्यांच्याच कृपेने २ घंटे नामजप अन् प्रार्थना करण्याची संधी मिळाली.
अ. ‘१०.५.२०२३ या दिवशी उत्तररात्री २.४५ ते ३.५० या वेळेत, तसेच दुपारीही १ घंटा गुरुमाऊलींनीच माझ्याकडून सहजतेने, एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करवून घेतला’, असे मला जाणवले.
आ. नामजप झाल्यावर मला ध्यानातून बाहेर आल्यासारखे आणि स्वतःलाच आध्यात्मिक लाभ झाल्यासारखे वाटले.
इ. ‘गुरुमाऊलींनी त्यांच्या ब्रह्मोत्सवात सहभागी करून घेऊन खारीचा वाटा देऊन आनंद दिला आहे’, असे वाटून जप करतांना मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
३. पू. रमेश गडकरी (वय ६५ वर्षे)
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी मला ध्यान लावायचे होते. त्याप्रमाणे मी ११.५.२०२३ या दिवशी पहाटे ४.३० वाजता ध्यान लावायला बसलो.
३ अ. ध्यानाला बसल्यावर ‘स्वतः तिन्ही गुरूंच्या मध्ये बसून सोहळ्यातील अडथळे दूर होण्यासाठी ध्यान लावून प्रार्थनेचे आलंबन करत आहे’, असे दृश्य दिसणे : ध्यानाला बसल्यावर मला पुढील दृश्य दिसले. ‘माझ्या समोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, माझ्या डाव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि उजव्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या आहेत. तिन्ही गुरूंमुळे बनलेल्या त्रिकोणाच्या मध्यभागी मी बसलो आहे आणि मी सोहळ्यातील अडथळे दूर होण्यासाठी ध्यान लावून प्रार्थनेचे आलंबन करत आहे.’
३ आ. तिन्ही गुरूंकडून स्वतःच्या हृदयमंदिरात स्थापन केलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुकांवर आशीर्वादरूपी चैतन्याचा स्रोत येत असल्याचे जाणवणे : त्या वेळी मला जाणवले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिघांच्या मधोमध बसल्याने या तिघांकडून माझ्या हृदयावर आशीर्वादरूपी चैतन्याचा स्रोत येत होता. तो स्रोत माझ्या हृदयमंदिरात स्थापन केलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुकांवर पडत होता, तसेच माझ्या हृदयातील या पादुकांमधून बाहेर पडणारे चैतन्य शरिरातील पेशीपेशीत पसरत होते.’
३ इ. ‘कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष दुर्गादेवी आणि तिचे अगणित सैन्य अडथळ्यांचे निवारण करत आहे’, असे दिसणे : त्यानंतर थोड्या वेळाने ‘कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष दुर्गादेवी वाघावर आरूढ होऊन आली आहे आणि तिच्या समवेत तिचे अगणित सैन्य अनिष्ट शक्तींची आक्रमणे अन् अडथळे यांचे निवारण करत आहेत’, असे मला दिसत होते.
३ ई. त्याच वेळी ‘उच्च लोकांमध्ये देवता, सप्तर्षी, ऋषिमुनी, यक्ष, गंधर्व आणि किन्नर यांची सोहळ्याला येण्याची लगबग चालू आहे’, असे मला जाणवले.
३ उ. ‘कार्यक्रमस्थळी सर्व देवतांचे तत्त्व आधीपासूनच कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले.
३ ऊ. अशा प्रकारे ‘ध्यानाचा एक घंटा कधी गेला ?’, हे मला कळलेही नाही. या वेळेत माझ्या मनात कोणताही अनावश्यक विचार आला नाही.’
४. सद़्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६० वर्षे)
४ अ. ‘कार्यक्रमासाठी नामजपादी उपाय करण्याची संधी मिळाली’, याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथामध्ये बसल्यावर या तिघांचे अन् रथाचे रक्षण व्हावे’, तसेच ‘रथातून आणि तिन्ही गुरूंच्या माध्यमातून सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित व्हावे’, यासाठी विशुद्धचक्रावर तळहात ठेवून १ घंटा ‘शून्य’ हा नामजप करणे’, असा उपाय करण्याचा निरोप मला मिळाला. त्या वेळी ‘मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित न रहाता कार्यक्रमासाठी नामजपादी उपाय करण्याची संधी मिळाली’, याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४ आ. ‘नामजप होऊ नये’, यासाठी अनिष्ट शक्ती अडथळा आणत आहेत’, असे वाटणे : आरंभी माझ्याकडून नामजपादी उपाय भावपूर्ण होत होते. ‘प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली विशुद्धचक्रावर उपाय करत आहे’, असा भाव त्यांच्या कृपेने माझ्या मनात निर्माण झाला; परंतु ५ मिनिटांनंतर ‘माझा ‘शून्य’ हा जप होण्याऐवजी ‘निर्गुण’ हा जप चालू झाला आहे’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी तो जप थांबवून पुन्हा ‘शून्य’ हा जप करणे चालू केले. थोड्या वेळाने पुन्हा माझ्याकडून ‘शून्य’ हा जप होण्याऐवजी ‘निर्गुण’ हा जप चालू झाला. असे २ – ३ वेळा झाल्यावर ‘शून्य’ हा जप न होण्यासाठी अनिष्ट शक्ती अडथळा आणत आहेत’, असे मला वाटले.
४ इ. या अडथळ्यावर उपाय म्हणून मी भ्रमणभाषवरील ‘सनातन चैतन्यवाणी अॅप’वर ‘शून्य’ हा जप लावून नामजप करणे चालू ठेवले. त्यानंतर माझ्याकडून हा जप भावपूर्ण झाला.
४ ई. कार्यक्रमातील अडथळे दूर होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रार्थना करणे : कार्यक्रमातील अडथळे दूर होण्यासाठी जप करतांना माझ्याकडून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना झाली, ‘हे माते, आपण साक्षात् दुर्गादेवीचे रूप आहात. आपले मारक तत्त्व जागृत होऊन या रथोत्सवातील सर्व अडथळे दूर होऊ देत’ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी प्रार्थना झाली, ‘हे माते, आपले तारक तत्त्व कार्यरत होऊन सर्व साधकांना या रथोत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर पूर्णपणे लाभ होऊ दे.’
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेने मला ब्रह्मोत्सवानिमित्त नामजपादी उपाय करण्याची संधी मिळाली’, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
इदं न मम ।’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १२.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |