जगद़्गुरु तुकाराम महाराजांची पालखी १५ जूनला यवत, तर १६ जूनला वरवंड येथे मुक्कामी !
दौंड (जिल्हा पुणे) – जगद़्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी १५ जूनला दौंड तालुक्यात प्रवेश करत आहे. १५ जूनला पहिला मुक्काम यवत, तर १६ जूनला दुसरा मुक्काम वरवंड या ठिकाणी आहे. या वेळी पालखी सोबत असणार्या भाविक आणि वारकरी यांच्या स्वागतासाठी यवतकर आणि वरवंडकर यांनी जय्यत सिद्धता केली आहे. ही सिद्धता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी यवत पोलीस ठाणे आणि प्रशासन सज्ज झाले आहे.
यवत येथील काळभैरवनाथ मंदिरात तुकोबांची पालखी मुक्कामी असते. या वेळी तालुका प्रशासनासह यवत ग्रामपंचायत प्रशासन आणि संपूर्ण ग्रामस्थ या पालखी सोहळ्याच्या सिद्धतेत गुंतलेले असतात. एका वेळी सहस्र भाविक स्नान करू शकतील, अशी सोय (महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था) काळभैरवनाथ मंदिर आणि प्राथमिक शाळेत केली आहे. गावातील बाजारतळ, शाळेच्या मैदानात आणि त्याचसह गावात असणार्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात दिंड्या त्यांचा मुक्काम करतात. त्या जागांची स्वच्छता यासह तेथे दिवाबत्तीची सोय, महालक्ष्मी मंदिर काळभैरवनाथ मंदिर आणि पालखी मार्गांवर स्वागत कमानी यांच्यासह आकर्षक विद्युत् रोषणाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आल्याची माहिती यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे आणि ग्रामविकास अधिकारी बी.बी. चखाले आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी दिली आहे.