महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात नृत्यकलाकार नृत्याच्या माध्यमातून देवाला अनुभवण्याचा प्रयत्न करतात ! – डॉ. सहना भट, संस्थापिका, ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्बळ्ळी, कर्नाटक
हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील ‘नाट्यांजली कला केंद्रा’च्या संस्थापिका डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्यांगना) यांनी वर्ष २०२२ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी येथे झालेल्या नृत्याच्या संशोधनात्मक प्रयोगांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर डॉ. सहना भट यांची कर्नाटक येथील वेणुध्वनी के.एल्.ई. या आकाशवाणी केंद्रावर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा विषयच डॉ. सहना भट यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला दिलेल्या भेटीच्या कालावधीत ‘नृत्य आणि साधना’ या विषयाला धरून त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी, त्यांना या वेळी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे, असा होता. ८ जून २०२३ या दिवशी या मुलाखतीचा काही भाग आपण वाचला. आजच्या लेखात आपण त्यापुढील भाग डॉ. सहना भट यांच्याच शब्दांत पहाणार आहोत.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/690015.html
६. नृत्य करतांना स्वतःला जाणवत असलेली दैवी ऊर्जा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून सिद्ध झाल्याने त्यातून आनंद मिळणे
त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधारण मनुष्याचे सकारात्मक ऊर्जेचे प्राथमिक निरीक्षण (बेसलाईन रिडींग) साधारण १ मीटरही नसते. नृत्यापूर्वी माझीसुद्धा सकारात्मक ऊर्जा १ मीटरपेक्षा अल्प होती; परंतु प्रयोग झाल्यावर पुन्हा रिडींग घेतल्यावर सकारात्मक ऊर्जा १० मीटरहून अधिक झाली होती, हे त्या प्रयोगातून सिद्ध झाले. मी जेव्हा नृत्य करायचे, तेव्हा मलाही वेगळीच शक्ती जाणवायची. त्याचप्रमाणे नृत्य पहाणार्यांनासुद्धा चांगली स्पंदने जाणवायची; परंतु यात हेच सर्वकाही वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने मीटरच्या माध्यमातून पाहिल्याने मला पुष्कळ समाधान मिळाले.
माझ्या दोन्ही शिष्यांनीही (कु. निसर्गा दयन्नवर आणि कु. पूजा हेगडे यांनी) प्रयोगांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनाही येथे नृत्य केल्यावर वेगळेपण जाणवले.
७. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात नृत्य करतांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
७ अ. नृत्य करतांना श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श अनुभवून भावविभोर स्थिती अनुभवता येणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि सनातन आश्रम येथे पुष्कळ चांगली स्पंदने आहेत. कलाकार हा भावुक असतो. नृत्य करतांना नृत्याशी तो एकरूप होऊन जातो. दुसर्या दिवशी मी तेथे भगवान श्रीकृष्णाच्या लीलांवर आधारित असणारे नृत्य सादर केले. प्रयोगासाठी ते नृत्य मी दोन वेळा आणि २० मिनिटे सलग, न थांबता केले. ‘पहिल्या वेळी जे नृत्य केले, ते मी केले; परंतु दुसर्या वेळी जे नृत्य केले, ते मी केलेच नाही’, असे मला जाणवले. नृत्याच्या शेवटी मी ‘श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करून वंदन करते आणि मग नृत्य संपते’, अशा स्वरूपाचे नृत्य होते; परंतु हा अभिनय करता करताच साक्षात् श्रीकृष्ण माझ्या समोर आला ! मला श्रीकृष्ण डोळ्यांसमोर दिसत होता आणि मी प्रत्यक्षात त्याच्या चरणांना स्पर्श करत असल्याची अनुभूती मला आली. त्यानंतर तेथून मला ५ मिनिटे हलताच आले नाही. चित्रीकरण संपले; परंतु मला त्याचे काही भानच नव्हते. श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श केल्याचा संपूर्ण अनुभव घेऊन तो मी इतरांनासुद्धा सांगितला. त्या सर्वांनाही ते ऐकून पुष्कळ आनंद झाला. याविषयी चर्चा चालू असतांना ‘वेळ कधी गेला ?’, हे मला कळलेच नाही.
७ आ. ‘आनंद हे एकच तत्त्व आहे’, याची अनुभूती येणे : ‘आनंद हे एक तत्त्व आहे’, असे मला जाणवले. रस, उत्पत्ती आणि अंत म्हणजे रसोत्पत्ती आपल्याला स्थितप्रज्ञ स्थितीला नेते. हा कलाकाराचा एक तर्कसुद्धा असू शकतो. तर्क कि दुर्बलता हे मला ठाऊक नाही; परंतु त्या स्थितीतून बाहेर येण्यास थोडा वेळ लागतो. मला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श केल्याची जाणीव झाली आणि त्या एकरूपतेतून मला बाहेर पडता आले नाही. असा अनुभव मला केवळ आमच्या कुलदेवतेच्या देवस्थानात अथवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी नृत्य केल्यावर आला आहे. ही अनुभूती आल्याने मी थोडी भावुकही झाले.
८. ‘नृत्यकला आध्यात्मिक स्तरावर कशी अनुभवावी ?’, याविषयीची डॉ. सहना भट यांना सुचलेली सूत्रे
८ अ. कलाकाराचा कलेप्रती समर्पण भाव पुष्कळ वाढलेला असल्यामुळे त्याला देवाचा अधिक आशीर्वाद मिळत असणे : ‘भक्ती सर्वांमध्येच असते; परंतु मनुष्य जेव्हा कलाकार म्हणून जन्म घेतो, तेव्हा त्याचा कलेप्रती समर्पणभाव पुष्कळ वाढतो. त्यामुळे त्याला भगवंताचा अधिक आशीर्वाद मिळतो’, असे मला वाटते. भगवंताने म्हणूनच माझ्याकडून सेवा करून घेतली. मला असे वाटते की, ‘कला भगवंताने निर्माण केली आहे आणि ती तोच सादर करणार आहे, माध्यम मी आहे !’, असे मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना सांगितल्यावर त्यांनाही पुष्कळ आनंद झाला आणि त्यांच्या अंगावर रोमांचसुद्धा आले.
८ आ. नृत्याच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती लवकर होत असणे : नृत्य म्हणजेच एक आध्यात्मिक साधना आहे. जेव्हा नवीन विद्यार्थी माझ्याकडे कला शिकण्यास येतात, तेव्हा मी आरंभीच त्यांना सांगते, ‘नृत्य केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते. नृत्याने शरीर सुदृढ रहाते, तसेच स्मरणशक्तीही वाढते. कोणत्याही मार्गात प्रगती करून घेण्यासाठी आणि उत्तम व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी नृत्य हे एक सुंदर माध्यम आहे !’ नृत्याच्या माध्यमातून मनुष्य परिपूर्ण होऊ शकतो. आम्ही श्रीराम, श्रीकृष्ण, धीरोदत्त, धीरललित अशा विविध नायकांविषयी शिकतो. यात ‘नायक आणि भगवंत हा एकच कसा आहे आणि नायक कशा रितीने स्वतःला विविध स्वरूपांत भगवंताला समर्पित करतात ?’, हेच शिकतो अन् वाचतो.
यावरून माझ्या लक्षात आले की, लहान मुलांना आरंभीपासूनच ‘आपण करत असलेली कला ही देवासाठीच आहे’, या भावाने शिकवली पाहिजे आणि त्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. लहान मुलांना ‘देव’ म्हणजे श्रद्धा वाटते. आपण त्यांच्यामध्ये जर हीच श्रद्धा दृढ करत गेलो, तर त्यांच्या कलेवरच्या श्रद्धतेही वाढ होईल, उदा. अभ्यास करतांना मुलांमध्ये एक विश्वास असतो की ‘एखाद्या विषयाचा लक्षपूर्वक अभ्यास केला, तरच तो पूर्ण समजतो. हे आपण नृत्याच्या माध्यमातूनही करू शकतो. हे आपण अध्यात्माच्या माध्यमातूनच त्यांना समजावून सांगू शकतो’, असे मला वाटले.’
– डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्यांगना, नृत्यगुरु), संस्थापिका ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्बळ्ळी, कर्नाटक.
(समाप्त)
|