बनावट बियाणे !

पेरणीच्‍या हंगामात अनेकदा शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्‍यांची फसवणूक करण्‍यात येत असल्‍याच्‍या अनेक घटना समोर येत आहेत. कापसाच्‍या बियाण्‍यांच्‍या एका (४७५ ग्रॅम) पाकिटाचे मूल्‍य बाजारात ८३० ते ८५० रुपये (वाणानुसार मूल्‍य पालटते) आहे. असे असतांना काही जिल्‍ह्यांत अधिकची मागणी असलेल्‍या वाणांचा (जातींचा) तुटवडा असल्‍याचे कारण सांगत एका पाकिटासाठी १ सहस्र ५०० ते ३ सहस्र रुपये घेतले जात आहेत. ‘परराज्‍यातील बियाणे घेतल्‍यास अल्‍प दरात मिळेल; मात्र त्‍याच्‍या उगवण क्षमतेची कोणतीही निश्‍चिती मिळणार नाही’, असे विक्रेते सांगतात. ‘अधिक उत्‍पन्‍न मिळते’, असे सांगून ‘एच्.टी.बी.टी.’, ‘बिजी फोर’, ‘राऊंड अप’, ‘झिरो बीटी’ आदी नावांनी बनावट कापूस बियाण्‍यांची विक्री होत आहे. त्‍यामुळे ‘या बियाण्‍यांची खरेदी करू नये, तसेच शासनमान्‍य परवानाधारकांकडूनच बियाणे खरेदी करावे, दुकानदाराची स्‍वाक्षरी असलेले पक्‍के देयक घ्‍यावे, बियाणांचे पाकीट सीलबंद असल्‍याची निश्‍चिती करून घ्‍यावी, परराज्‍यातील अप्रमाणित बियाणे आणि खते यांची विक्री होत असल्‍यास, बियाण्‍यांची चढ्या दराने विक्री होत असल्‍यास तालुका कृषी अधिकारी अन् पंचायत समितीच्‍या कृषी विभागाकडे तक्रार करावी’, असे आवाहन शासनाकडून करण्‍यात आले आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांचा सहभाग असलेली भरारी पथके विविध कृषी केंद्रांची पडताळणी करत आहेत. शेतकर्‍यांची बियाणांच्‍या संदर्भात होणारी फसवणूक थांबवण्‍यासाठी राज्‍यशासनाने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी ‘येत्‍या पावसाळी अधिवेशनात त्‍याविषयीचा कायदा आणला जाणार आहे’, अशी घोषणा कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी केली आहे. ‘आमच्‍या अधिकार्‍यांनी ८७ ठिकाणी धाडी घातल्‍या. त्‍यात ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली, तर काही ठिकाणी आमचे अधिकारी पैसे घेत असल्‍याची वृत्ते आली आहेत’, अशी स्‍वीकृती त्‍यांनी दिली. शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍यांना हे सर्व घटक कारणीभूत आहेत, हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. भ्रष्‍ट अधिकार्‍यांवर काय कारवाई होणार, ते जनतेसमोर आले पाहिजे.

बनावट बियाणे आणि खते वापरून शेतकर्‍याच्‍या हिरव्‍या समृद्ध स्‍वप्‍नांचा पार चुराडा होतो. तो कर्जबाजारी होतो. त्‍याचा भ्रमनिरास होतो. त्‍यामुळे कृषी विभागाने याची गांभीर्याने नोंद घेत शेतकर्‍याच्‍या जिवाशी खेळणारे बनावट बियाणे आणि खत निर्माते अन् विक्रेते यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, हीच सर्व शेतकर्‍यांची इच्‍छा आहे !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव